सांगली : लिंब येथे पाच लाखांची दारू जप्त | पुढारी

सांगली : लिंब येथे पाच लाखांची दारू जप्त

विटा, पुढारी वृत्तसेवा : विट्याच्या राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने तासगाव तालुक्यातील लिंब येथील शिवराज ढाब्यावर छापा टाकून पाच लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त केली. गोवा बनावट मद्याची तस्करी करणार्‍या तिघांना अटक केली. संकेत शिवकुमार साळुंखे (वय 19), आशुतोष हिंदुराव साळुंखे (वय 24, दोघेही रा. आंधळी, ता. पलूस), अनिकेत धनाजी कांबळे (वय 25, रा. शिरगाव, ता.तासगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

विट्याच्या राज्य उत्पादन शुल्कीचे निरीक्षक वि. ओ. मनाळे यांनी सांगितले की, तासगाव तालुक्यातील लिंब येथील हॉटेल शिवराज ढाब्याच्या मागच्या बाजूला गोवा बनावटी मद्याची तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर जिल्ह्याच्या अधीक्षिका संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी छापा टाकला.

यावेळी संशयित संकेत, आशुतोष व अनिकेत हे तिघे गोवा राज्यात विक्रीस असलेले मद्य व मुद्देमालासह मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली आंधळी येथे छापा टाकला असता गोवा येथे विक्री करण्यात येत असलेल्या मद्याच्या बाटल्यांवर ‘फक्त महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी’ असे खोटे लेबल लावल्याचे आढळले. असा एकूण 5 लाख 8 हजार 157 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्कचे विटा युनिटचे निरीक्षक मनाळे, दुय्यम निरीक्षक एस. आर. कोरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक दिलीप सानप, जवान रणधीर पाटील, वैभव पवार, दिलीप ऐनापुरे, आरिफ कोकणे आणि आकाश भोसले यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा;

Back to top button