कोल्‍हापूर: कबनूरची नगरपरिषद होण्यास शेतकऱ्यांचा विरोध | पुढारी

कोल्‍हापूर: कबनूरची नगरपरिषद होण्यास शेतकऱ्यांचा विरोध

कबनूर, पुढारी वृत्‍तसेवा : कबनूर गावची नगरपरिषद झाल्‍यास आपल्या शेतजमिनी आरक्षित होतील अशी भिती शेतकऱ्यांकडून व्यक्‍त केली जात आहे. त्यामुळे सुरूवातीपासूनच कबनूर गावची नगरपरिषद होण्यास त्यांचा विरोध आहे. तर आमदार प्रकाश आवाडे यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी कबनूर नगरपरिषदेची घोषणा प्रसिध्द होईल असे सूतोवाच केले आहे.

दरम्यान, नवीन झालेल्या हातकणंगले नगर-पंचायतीने नगररचना विभागाच्या आदेशानुसार गावातील शेतक-यांच्या सुमारे १८८ हेक्टर जमिनी गावचा विकास व सुशोभीकरणासाठी आरक्षित करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे कबनूरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. कबनूर ग्रामपंचायतच ठेवावी या मतावर ते ठाम आहेत.

कबनूर मधील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ह्या भोगवटदार वर्ग १ असताना तत्कालीन तहसिल -दार यांच्या चुकीच्या अभिप्रायामुळे त्या भोगवट- दार वर्ग २ दिसत आहेत. त्यामुळे या जमीनीची खरेदी-विक्री, बिगरशेती वा विकसित करताना ७५ टक्के नजराना भरुन त्या पहिला भोगवटदार वर्ग १ करुन घ्याव्या लागत आहेत. यासाठी लाखो रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे या जमीनी ठेवल्या तर आरक्षण पडण्याची शक्यता तर विक्री करायची म्हंटली तरी नाहक आर्थिक भुर्दंड अशा कात्रीत कबनूर मधील शेतकरी आज सापडला आहे.

शेतकरी अद्याप अधांतरीच

अनेक लोकप्रतिनिधींनी शेतजमीनी भोगवटदार वर्ग १ करु अशी आश्वासने दिली. जिल्हाधिकारी यांचे समवेत बैठका झाल्या. हा प्रश्न निकालात काढण्याचे ठरले. त्याप्रमाणे तहसिलदार व भूमापन विभागाने तांतडीने कबनूर मधील शेत जमीनीची सर्व्हे व गटनंबरची तसेच भोगवटदार २ कसे झाले? याची पडताळणी सुरु केली. मात्र अद्याप यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग अधांतरीच आहे.

हातकणंगले ग्रामपंचायतच ठेवावी 

गावच्या विकासासाठी ग्रामपंचायतीची नगर- पंचायत केली. मात्र पाच वर्षात विकासा ऐवजी समस्याचे डोंगरच उभे राहिले. आता तर शेतकऱ्यांच्या जमीनी आरक्षण होवू लागल्याने त्यांनी त्यास विरोध करीत हातकणंगले ग्रामपंचायतच ठेवावी अशी मागणी केली आहे.
कबनूरची नगरपरिषद व्हायला नको. शेतकऱ्यांच्या जमीनी आरक्षित होतील. तसेच भोगवटदार २ जमीन वर्ग १ करुन घेताना रेडीरेकनर दराच्या ७५ टक्के दराने एका एकराला ३५ ते ६५ लाख रुपये नजराणा भरावा लागत आहे. तेवढी किंमतही शेतजमीनीला मिळत नाही. शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. यासाठी कबनूरची ग्रामपंचायतच ठेवावी.
– मिलिंद कोले, चेअरमन, शांतीनाथ पतसंस्था 

हेही वाचा 

Kolhapur Ambabai : अंबाबाई मंदिरात आढळला यादवकालीन शिलालेख 

तुळजापूर: दिवाळी सुट्ट्यानिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांचा महापूर 

कोल्‍हापूर: गळ्यातील स्कार्फ गिरणीच्या पट्ट्यात अडकून महिलेचा मृत्यू 

Back to top button