चांदोली धरणातून विसर्ग पुन्हा सुरू; धरण १०० टक्के भरण्याच्या मार्गावर | पुढारी

चांदोली धरणातून विसर्ग पुन्हा सुरू; धरण १०० टक्के भरण्याच्या मार्गावर

वारणावती : पुढारी वृत्तसेवा

चांदोली धरण परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी वाढू लागली आहे. परिणामी धरणाचे दोन दरवाजे मंगळवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान उचलण्यात आले असून येथून 1250 कयुसेक्स व वीज निर्मिती केंद्रातून 800 क्युसेक्स असा एकूण 2 हजार 50 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला होता.

तोच विसर्ग आज बुधवारी दुपारी चारच्या दरम्यान वाढवण्यात आला आहे. मुख्य सांडव्यातून 1850 तर वीज निर्मिती केंद्रातून 1400 असा एकूण तीन हजार 250 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्यास विसर्गात आणखीन वाढ करण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावांना सतर्क राहावे असा इशारा ही धरण प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

दरम्यान गेल्या पाच-सहा दिवसांपासून चांदोली परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. आज सकाळपासून पावसाने थोडी उसंत घेतली आहे आज बुधवारी सकाळी आठ ते दुपारी 4 वाजेपर्यंत आठ तासात केवळ पाच मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

धरणात सध्या 34 . 31 टीएमसी पाणीसाठा असून धरण 99.72 टक्के भरले आहे. उद्या 100% भरेल अशी चिन्हे आहेत. मंगळवारी सकाळी आठ ते आज बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 24 तासात 50 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे तर आज अखेर 2652 मिलिमीटर पाऊस येथे पडला आहे. धरणाची पाणी पातळी सध्या 626 .80 मीटर आहे.

हेही वाचले का?

Back to top button