

मानवत; पुढारी वृत्तसेवा : ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेलेला युवकाचा मृतदेह सापडला. मानवत तालुक्यातील पोहंडुळ येथील युवकाचा मृतदेह तब्बल १२ तासांनी सापडला. आज सकाळी ८ वाजता घटनास्थळापासून पहाटे शंभर मीटर अंतरावर पुरात वाहून गेलेला युवकाचा मृतदेह सापडला.
७ रोजी दिवसभर तालुक्यात तब्बल ७०.८ मिमी इतका मुसळधार पाऊस झाला. पावसाने तालुक्यात सर्वत्र दाणादाण उडाली.
पोहंडुळ येथे ज्ञानोबा आळसे, कैलास आरसुळ, भगवान धोपटे व योगेश धोपटे हे शेतकरी घरी जात होते. सायंकाळी सहाच्या सुमारास गावात जात असताना ओढ्याला पूर आला होता.
योगेश धोपटे या २७ वर्षीय युवकास पोहता न आल्याने तो वाहून गेला. इतर तिघांनी पोहून किनारा गाठला.
बाजार समितीचे संचालक माधव नानेकर यांनी प्रशासनाला माहिती दिली.
तहसीलदार डी डी फुफाटे, पोलीस निरीक्षक सुभाष राठोड, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, मंडळ अधिकारी प्रशांत जोशी पोहोचले.
मानवत नपाचे अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन समितीचे कर्मचारी रात्री ९ वाजता पोहंडुळला दाखल झाले.
ग्रामस्थांच्या सहकार्याने शोधमोहीम हाती घेतली. परंतु, रात्री योगेश धोपटे सापडला नाही.
बुधवारी ता. ८ रोजी पहाटे ६ च्या सुमारास घटनास्थळापासून १०० मी. अंतरावर योगेशचा मृतदेह सापडला.
७ रोजी झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शेतात पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सखल तसेच नदी व ओढ्यालगत असलेल्यांच्या घरात व दुकानात पाणी शिरले. लाखो रुपयांचे नुकसान झाले. प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती नायब तहसिलदार नकुल वाघुंडे यांनी दिली .
तालुक्यात अतिवृष्टीने शेतात मोठया प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे कापूस व सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले.
शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची तातडीची मदत द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
निवेदनावर संभाजी ब्रिगेड चे गोविंद घांडगे, माधव शिंदे, राजेभाऊ होगे, कृष्णा शिंदे, सूरज काकडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हेही वाचलं का ?