सांगली : 'पालिकेची सत्ता जाईल' या भितीपोटी त्यांनी करवाढ स्थगितीचे दिले पत्र : संजय भिंगारदेवे | पुढारी

सांगली : 'पालिकेची सत्ता जाईल' या भितीपोटी त्यांनी करवाढ स्थगितीचे दिले पत्र : संजय भिंगारदेवे

विटा : पुढारी वृत्तसेवा ; चतुर्थ वार्षिक कर आकारणी करण्याचा ठराव मागच्या कौन्सिलनेच केला होता. मात्र, त्यामुळे लोकरोषाने पालिकेची सत्ता जाईल या भितीपोटी त्यांनी करवाढ स्थगितीचे पत्र दिले. यापूर्वीच करवाढ कमी करण्याच्या मागणीवर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला असा दावा पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे यांनी केला.

कोरोना संसर्गमुळे विस्कटलेल्या आर्थिक गणितांमुळे चतुर्थ वार्षिक कर आकारणी मार्चपर्यंत स्थगित करण्याची मागणी विटा पालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील आणि माजी सत्ताधारी गटाच्या सदस्यांनी गेल्या आठवड्यामध्ये पालिका प्रशासक संतोष भोर यांच्याकडे केली होती. यानंतर विटेकरांची १० टक्के कर वाढ रद्द झाली आहे. ही करवाढ आपल्या मागणीमुळेच रद्द झाली असा दावा विरोधी गटाने केला आहे. याबाबत माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे यांनी पत्रकारांच्या समोर स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी माजी नगरसेवक अनिल म. बाबर, शिवसेना शहराध्यक्ष राजू जाधव, माजी नगरसेवक अमर शितोळे, समिर कदम, रामचंद्र भिंगारदेवे, रणजित पाटील, अय्याज मुल्ला, विजय सपकाळ, काँग्रेसचे विटा शहराध्यक्ष सुरेश पाटील, गजानन सुतार, राहुल शितोळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

संजय भिंगारदेवे म्हणाले की, पालिकेच्या मावळत्या कौन्सिलच्या अखेरच्या सभेत चतुर्थ वार्षिक कर पुनर्रचना करणे आणि सर्वेक्षणासाठी मक्तेदार नेमण्याबाबत विषय मंजूर केला होता. वास्तविक पाहता कोरोनाचे भीषण संकट आणि मोडकळीस आलेले उद्योग लक्षात घेता, पालिकेने हे विषय चर्चेत घेणे आवश्यक नव्हते. तरीही त्यात हे दोन्ही विषय अग्रक्रमाने घेऊन मंजूर करण्यात आले. आम्ही ५ एप्रिल रोजी निवेदन देऊन जनतेची कोरोना काळातील अर्थिक परिस्थिती पाहता चतुर्थ वार्षिक करवाढ न करण्याबाबत मागणी केली होती. याबाबत आम्ही सातत्याने आमदार अनिलराव बाबर आणि सुहास बाबर यांच्या माध्यमातून प्रशासकांकडे पाठपुरावा केला होता. आमच्या मागणीला यश मिळणार असे लक्षात येताच मावळत्या सत्ताधाऱ्यांनी ही मागणी पुन्हा करीत चतुर्थ वार्षिक करवाढीला मार्चपर्यंत स्थगिती देण्याची मागणी केली.

वास्तविक ठराव करायचा आणि पुन्हा तुम्हीच स्थगिती मागायची, यातले राजकारण लोकांच्याही चांगलेच लक्षात आले आहे. कौन्सिलच्या ठरावाप्रमाणे करवाढ झाल्यास लोकांच्यात असंतोष होईल आणि पालिकेच्या निवडणुकीत फटका बसेल अशी शक्यता दिसू लागल्याने मार्चपर्यंत करवाढ स्थगित करण्याची मागणी केली, असा आरोप भिंगारदेवे यांनी केला. दरम्यान, पाटील गटाच्या शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्तीच्या मागणीबाबत बाबर गटाच्या समीर कदम यांनी ही मागणी केली होती. गेल्या चाळीस वर्षात तुमची सत्ता असताना आम्ही वारंवार मागणी करूनही त्याकडे तुम्ही सोयीस्कर दुर्लक्ष केले. आता तीच मागणी तुम्ही का करीत आहात? असा सवालही कदम यांनी केला. शहरात कोंडवाड्याची आर्थिक तरतूद पालिकेकडे आहे. मग कोंडवाडा कोठे आहे?, असा सवाल राहुल शितोळे यांनी केला.

तसेच मावळत्या सत्ताधाऱ्यांनी जर शहर स्वच्छतेबाबत प्रशासकांवर आक्षेप असतील तर उर्वरीत कालावधीसाठी या पालिकेवर प्रशासक म्हणून आयएएस दर्जाचा अधिकारी नेमावा. याबाबत आम्ही आमदार बाबर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे मागणी करू. मात्र, प्रशासन तेच आहे, ठेकेदारही तेच आहेत. मग स्वच्छतेच्या कामात शिथीलता आली असे त्यांना का वाटते? आणि तर ठेकेदार बदलून सक्षम ठेकेदार नेमा, अशी मागणीही माजी उपनगराध्यक्ष भिंगारेदवे यांनी केली. दरम्यान, दहा टक्के करवाढ करून नागरीकांना दिलासा मिळाला आहे, पण ही करवाढही रद्द व्हावी यासाठी आमदार बाबर यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे राजू जाधव यांनी सांगितले.

हेही वाचलंत का? 

Back to top button