सांगली : शेड्याळ येथे जमावाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू | पुढारी

सांगली : शेड्याळ येथे जमावाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

जत; पुढारी वृत्तसेवा : शेड्याळ (ता. जत) येथे दारूची बाटली न दिल्याने गावातीलच दहा जणांच्या जमावाने एका समाजाच्या घरावर हल्ला केला होता. या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले होते. या हल्ल्यात बादल रमेश चव्हाण (वय २७) गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर सांगली येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्यान रविवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास बादल यांचे निधन झाले. याप्रकरणी यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यावरून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेने गावातील वातावरण तणावग्रस्त बनले आहे. परिणामी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या कारणास्तव तहसीलदार जीवन बनसोडे यांनी जत तहसिल कार्यालय व उपविभागीय कार्यालय परिसरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. गावात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी जत उपविभागीय पोलीस कार्यालयास भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. या घटनेची कसून चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, दारूची बाटली दे म्हणून सागर चव्हाण यांच्या घरावर शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास गावातील १० जणांनी दगडफेक केली होती. घरातील फ्रीज, टीव्ही व घराबाहेर लावलेल्या दोन मोटारसायकली जाळल्या होत्या. घरातील बादल रमेश चव्हाण, सागर रमेश चव्हाण, आकाश रमेश चव्हाण यांना जबर मारहाण करण्यात आली होती. सागर व आकाश हे पळून गेल्याने बचावले. जमावाच्या ताब्यात सापडलेल्या बादल यास शेडयाळचे माजी सरपंच अशोक पाटील, चंदू गुगवाड, सुरेश हावगोंडी, सुरेश देवर्षी, मास्तर तेली व अन्य अनोळखी पाच जणांनी बेदम मारहाण केली होती. जखमी बादलवर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, पोलिसांनी माजी सरपंच अशोक पाटील, चंदू गुगवाड, सुरेश हावगोंडी, सुरेश देवर्षी, मास्तर तेली व अन्य अनोळखी पाच जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केला व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी चंदू गुगवाड व सुरेश देवर्षी, सुरेश हावगोंडी या तिघांना अटक केली होते. संशयित आरोपी म्हणून नितीन नरूटे, नागेश श्रीशैल गुगवाड या दोघांना पोलिसांनी अटक करून खातरजमा करून गुन्हा दाखल केला आहे. यातील संशयित आरोपी मास्तर तेली, अशोक पाटील फरार आहेत. रविवारी पहाटे जखमी बादलचा मृत्यू झाल्यानंतर दुपारी पूर्वी गुन्हा दाखल असलेल्या १० जणांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपाधीक्षक रत्नाकर नवले करत आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button