कळंबला घरपट्टीवसुलीसाठी अनोखी योजना; शंभर टक्के रक्कम भरल्यास मिळणार पाच टक्के सूट | पुढारी

कळंबला घरपट्टीवसुलीसाठी अनोखी योजना; शंभर टक्के रक्कम भरल्यास मिळणार पाच टक्के सूट

मंचर; पुढारी वृत्तसेवा: ‘कळंब (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने शंभर टक्के घरपट्टी व पाणीपट्टीवसुलीसाठी अनोखी योजना राबविण्यात आली आहे. याअंतर्गत चालू वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी येत्या 31 ऑगस्टपर्यंत भरल्यास पाच टक्के सूट देण्यात येणार असून, मिळकतधारकास दोन प्लास्टिक टब भेट देण्यात येणार आहेत,’ अशी माहिती सरपंच राजश्री भालेराव आणि उपसरपंच डॉ. सचिन भालेराव यांनी दिली.

या योजनेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या वेळी राजश्री भालेराव, उपसरपंच डॉ. सचिन भालेराव तसेच ग्रामपंचायत सदस्य नीलेश ऊर्फ पप्पू येवले यांनी स्वतः चालू वर्षाची घरपट्टी भरून नागरिकांपुढे आदर्श ठेवला आहे; जेणेकरून गावातील मिळकतधारकांनी या योजनेचा फायदा घेऊन जास्तीत जास्त घरपट्टी व पाणीपट्टी जमा व्हावी, या हेतूने ही योजना राबवीत असल्याचे ग्रामसेविका मंगल भोईर यांनी सांगितले. ग्रामपंचायत सदस्य भरत कानडे, उत्तम भालेराव, गणेश वर्पे, नंदकुमार भालेराव, नागेश भालेराव, दत्तात्रय वर्पे, नीलेश भालेराव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button