सांगली : औदुंबर ते चोपडेवाडी दरम्यान आढळल्या तब्बल बारा मगरी; यंदा कृष्णाकाठी असणाऱ्या मगरींच्या स्थलांतराला ब्रेक | पुढारी

सांगली : औदुंबर ते चोपडेवाडी दरम्यान आढळल्या तब्बल बारा मगरी; यंदा कृष्णाकाठी असणाऱ्या मगरींच्या स्थलांतराला ब्रेक

पलूस ; तुकाराम धायगुडे : औदुंबर- भिलवडी- चोपडेवाडी प्रवासादरम्यान कृष्णा नदीपात्रात तब्बल बारा मगरींचा अधिवास पहायला मिळाला.  तालुक्यातील चोपडेवाडी येथील ग्रामदैवत लक्ष्मी यात्रेनिमित्त आले होते. यावेळी बोटीतून चार तास प्रवासादरम्यान त्यांना लहान मोठ्या मगरींचे दर्शन  घडले.  या मगरींचा आकार साधारण सहा फुटांपासून ते तेरा चौदा फुटांपर्यंत आहे. यावरून असेही लक्षात येते की, यंदा नदीची पाणीपातळी स्थिर असल्याने मगरींच्या स्थलांतराला ब्रेक मिळाला आहे.

गेल्या काही वर्षांत २०जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान कृष्णा नदी पात्राबाहेर असल्याने पुरस्थिती असायची. अशा वेळी मगरींचा आजूबाजूला चरी, ओढे, वगळी शेतांमध्ये वावर पहायला मिळायचा. यंदा मात्र पाणीपातळी स्थिर असल्याने मगरींना आपला अधिवास सोडावा लागलेला दिसत नाही.

कृष्णा नदीत सातत्याने कारखान्यातील सोडल्या जाणाऱ्या रासायनिक मळीच्या जलप्रदूषणामुळे लाखो मासे मृत होण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच नदीत इतर माशांचे मत्सबीज खाणाऱ्या खिलापीया माशांची संख्या वाढत आहे. अशावेळी नदीतील इतर मासे नष्ट होण्याची भिती निर्माण झालेली आहे. मात्र या खिलापीया माशांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणारी मगर ही अत्यंत महत्त्वाची जैव नियंत्रक आहे. म्हणून कृष्णा नदीमध्ये मगरीचे अस्तित्व अत्यंत गरजेचे आहे.

तर कृष्णाकाठी ज्या ज्या ठिकाणी गावागावातील गटारगंगा नदीच्या पाण्यात मिसळते त्या त्या ठिकाणी खिलापीया मासे प्रचंड वाढले आहेत. ते खाण्यासाठी गेल्या दोन तीन वर्षात मगरींचा पाणवठ्यावर वावर वाढला असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. नदी हाच मगरीचा नैसर्गिक अधिवास आहे. कृष्णाकाठावरील बेसुमार वाळू उपसा, माती उपसा या निसर्गावरील मानवी आक्रमणानेच मगर आणि मानव हा संघर्ष निर्माण होत आहे.

बेसुमार वाळू उपशामुळे मगरीची नैसर्गिक आश्रयस्थान नष्ट झाल्याने कृष्णाकाठावर मगरीचा वावर वाढल्याचे दिसते. त्यांना पकडून इतरत्र हलवल्यास इतर ठिकाणच्या मगरी पुन्हा या ठिकाणी येणारच आहेत. शिवाय हे शिप्टींग मगरीच्या जीवावर बेतू शकते.
साधारणत: जानेवारी ते जून हा मगरीचा विनीचा हंगाम असल्याने ती या काळात अधिक आक्रमक असल्याचे आढळते. मगरीने ४० वर अंडी जरी घातली तरी प्रत्यक्षात त्यातून जगणाऱ्या पिलांचे प्रमाण अत्यल्प आहे. निसर्गच मगरीच्या संख्येवर नियंत्रण ठेवत असतो.

मगर ही गैरसमज, सरहद्दनिष्ठा आणि आत्मसंरक्षण या तीन कारणांनी माणसावर हल्ले करते. सावधानता हाच मगरीपासून वाचण्याचा महत्वाचा उपाय आहे. तसेच मगर ही पाण्यातील अस्वच्छता नष्ट करण्याचे मानवहिताचे महत्त्वपूर्ण कामही करत असते.

 मगर ही सरहद्द प्रिय वण्यजीव आहे. सहजासहजी ती तिचा नैसर्गिक अधिवास सोडत नाही. महापूरासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या अपवादात्मक काळातच ती स्थलांतर करते.
आजूबाजूच्या ओढा वगळीतून स्थलांतर केलेल्या मगरी या पूराचे पाणी ओसरताच परत नदीपात्रात येतात. यामध्ये ज्या मोठ्या मगरी असतात त्या पाणी ओसरतानाच पात्राकडे परततात. मगर निशाचर असल्याने हा प्रवास रात्रीचा असतो. मात्र यामधील लहान आकाराच्या मगरी या भक्षाच्या शोधात अथवा भक्षाच्या विपुलतेमुळे काही लहानमोठ्या चरी, कँनॉल, विहरी, ओढ्यामध्ये वास्तव्य करतात. नैसर्गिक गरजेसाठीच नंतर त्या नदीपात्राकडे गेल्याचे आढळले आहे
– निसर्गप्रेमी संदीप नाझरे, आमणापूर

 

    हेही वाचलंत का ?

Back to top button