Sanjay Raut money laundering case | संजय राऊत मनी लॉंड्रिंग प्रकरण : मुंबईत दोन ठिकाणी ईडीचे छापे

मुंबई; पुढारी ऑनलाईन : ईडी कोठडीत असलेले शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याशी संबंधित मनी लॉंड्रिंग प्रकरणी (Sanjay Raut money laundering case) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज मुंबईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने चार दिवसांची कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पत्राचाळ प्रकरणी ईडीने आणखी काही लोकांना समन्स बजावले आहे
रविवारी सकाळी ‘ईडी’च्या पथकाने संजय राऊत यांच्या मुंबईतील भांडुप येथील घरावर छापेमारी केली होती तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर त्यांना घेवून ईडी पथक कार्यालयाकडे रवाना झाले होते. ईडी कार्यालयात त्यांची पुन्हा सलग चौकशी झाली. मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली होती.
Sanjay Raut money laundering case | सुमारे १ हजार ३४ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात सुमारे १ हजार ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. याप्रकरणी मनी लॉंड्रिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करून ईडी तपास करत आहे. पत्राचाळ पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यांत संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊत यांची गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी सहभागी होती. पुढे ही कंपनी त्यातून बाहेर पडली. मात्र, या व्यवहारात कंपनीला मोठा फायदा झाला होता. प्रवीण राऊत यांना या व्यवहारात मिळालेल्या पैशांतील काही पैसे संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याही खात्यात वळविण्यात आल्याचा आरोप आहे.
घोटाळ्यातील पैशांतून वर्षा राऊत यांच्या नावाने दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग येथील किहीम येथे भूखंडांची खरेदी करण्यात आल्याचा ठपका ठेवत ईडीने अशा ११.१५ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. याच अनुषंगाने ईडीने राऊत यांची यापूर्वी चौकशी केली होती. त्यानंतर ईडीने जुलै महिन्यात पुन्हा एकदा चार वेळा चौकशीसाठी समन्स जारी केले होते. यातील एका वेळी राऊत हे चौकशीला हजर राहिले. मात्र, अन्य समन्सला ते अनुपस्थित राहिले. अखेर ईडीने राऊत हे चौकशीला हजर न राहून सहकार्य करत नसल्याची नोंद करत रविवारी सकाळी राऊत यांच्या घरी छापेमारी केली होती.
Sanjay Raut money laundering case | ED raids taking place at two different locations in Mumbai
— ANI (@ANI) August 2, 2022
नॅशनल हेराल्डप्रकरणीही मुंबईत छापेमारी
दरम्यान, नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने दिल्लीतील नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर छापा टाकला. ईडीचे अधिकारी नॅशनल हेराल्डच्या कार्यालयात (National Herald Case ) जाऊन शोध मोहीम घेत आहेत. ही कारवाई आज (दि.२) सकाळपासून सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबईतही छापेमारी करण्यात आली आहे. दिल्लीशिवाय ईडीने देशभरात जवळपास १२ ठिकाणी छापे टाकले आहेत. ईडीचे दिल्लीतील तपास अधिकारी हेराल्ड हाऊसच्या कार्यालयात असून ते कागदपत्रांची तपासणी करत आहेत. दिल्ली, कोलकाता यासह १२ ठिकाणी छापेमारीची कारवाई सुरू आहे. डोटेक्स मर्चेंडाईज आणि सुनील भंडारी यांच्या कोलकाता येथील ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. राहुल आणि सोनिया गांधी यांच्या चौकशीत एनआयएला ज्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत, त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता तपास यंत्रणा या ठिकाणी शोध घेत असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
ED summons some more people in Sanjay Raut's money laundering case
— ANI (@ANI) August 2, 2022