विटा; पुढारी वृत्तसेवा : मंत्रिपदाची नव्हे तर टेंभू योजना पूर्ण करण्यासाठी आणि मतदार संघातील लोकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहोत, अशी प्रतिक्रिया खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांनी दिली आहे.
गेल्या छत्तीस तासांपासून नॉटरिचेबल असलेले शिवसेनेचे सांगली जिल्ह्यातील आमदार अनिल बाबर हे अखेरीस रिचेबल झाले. सध्या ते शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या समवेत आसाममधील गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये आहेत. आमदार बाबर यांनी मोबाईलवरून प्रतिक्रिया दिली. गेल्या २८ वर्षांपासून टेंभू योजना पूर्ण करण्यासाठी झटत आहे. या योजनेचा ६ अ आणि ब टप्पा पूर्ण होणे गरजेचे आहे. २०१९ ला फडणवीस मुख्यमंत्री असताना ६ व्या टप्प्याला तांत्रिक मंजुरी दिली होती. सर्वेक्षण होऊन निधी मिळणे बाकी आहे, परंतु ही कामे होत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करूनसुद्धा उपयोग झाला नाही. गेल्या महिन्यात ६ व्या टप्प्यासाठी आरक्षित पाण्याला मंजूरी मिळाली. पण मंजूरी मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फलक लावत श्रेय घेतले. महाविकास आघाडीत हा मतदार संघ राष्ट्रवादीकडे घेण्याबाबतचीही चर्चा सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बोललो पण त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही असे बाबर यांनी म्हटले आहे.
हेही वाचलंत का?