औरंगाबाद : अडीच वर्षांत चिकलठाणा कचरा डेपोला 212 वेळा आग! | पुढारी

औरंगाबाद : अडीच वर्षांत चिकलठाणा कचरा डेपोला 212 वेळा आग!

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शहरात दररोज जमा होणार्‍या कचर्‍यावर प्रक्रिया करून महानगरपालिका त्याची विल्हेवाट लावू शकत नसेल तर कचरा डेपोंना आगी लागून कचरा नष्ट होतो आणि त्यातून प्रचंड वायू प्रदूषण होते; मात्र ही आग कोण लावते, ती कशी लागते याचा उलगडा 24 तास सुरक्षा रक्षकांचा पहारा असूनही पालिकेला होऊ शकलेला नाही. चिकलठाणा या एकाच कचरा डेपोला अडीच वर्षांत तब्बल 212 वेळा आग लागली, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

चिकलठाणा आणि पडेगाव येथील कचरा डेपोंना जानेवारी 2020 ते जून 2022 या काळात कितीदा आग लागली, ती विझविण्यासाठी किती पाणी खर्च झाले आणि किती पैसा खर्च झाला, याची विचारणा पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते सूरज अजमेरा यांनी माहितीच्या अधिकारात पालिकेकडे केली होती. त्यांना महिनाभरात महापालिकेने लेखी उत्तर दिले. त्याप्रमाणे चिकलठाणा कचरा डेपोला 212 वेळा आग लागली, ती विझविण्यासाठी तब्बल 6 लाख 45 हजार लिटर पाणी लागले, अग् निशामक बंबांमधील डिझेलवर एक लाख 93 हजार 580 रुपये खर्च झाले, तर कर्मचार्‍यांच्या पगारावर 9 लाख 75 हजार 200 रुपये खर्च झाले. पडेगावच्या कचरा डेपोला याच कालावधीत 129 वेळा आग लागली, ती विझविण्यासाठी वेळोवेळी 6 लाख 45 हजार लिटर पाण्याचा मारा करण्यात आला आणि कर्मचार्‍यांच्या पगारावर 7 लाख 93 हजार 400 रुपये, तर डिझेलवर एक लाख 93 हजार 500 रुपये खर्च झाल्याची माहिती पालिकेने अजमेरा यांना दिली.

प्रदूषणाचे काय?

कचरा डेपोला आग लागली, की महापालिका बंब पाठवून ती विझविते, परंतु तोपर्यंत हजारो टन कचरा जळून जातो. त्यातून वातावरणात पसरणार्‍या धुरामुळे प्रदूषण होते आणि आसपासच्या वसाहतींना जगणे अवघड होऊन बसते. त्यामुळे हा भयंकर प्रकार आहे. आग कशी लागली, याची चौकशीही महापालिका करीत नाही. कचरा नष्ट करण्याचा हा मार्ग जिवघेणा आहे. आपण याविरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागणार आहोत, असे सूरज अजमेरा यांनी सांगितले.

Back to top button