सांगली : म्हैसाळमध्ये एकाच कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या, १३ जणांना अटक | पुढारी

सांगली : म्हैसाळमध्ये एकाच कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या, १३ जणांना अटक

सांगली; पुढारी वृत्तसेवा : म्हैसाळ येथे सोमवारी एकाच कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केली होती. याप्रकरणी २५ खासगी सावकारांच्यावर खासगी सावकारी, आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन १३ संशयितांना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.

म्हैसाळ (ता. मिरज) येथे कर्जाला कंटाळून एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. आत्महत्या करण्यापूर्वी या कुटुंबाने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपास सुरू केला होता. याप्रकरणी १३ जणांना ताब्यात घेतले आहे. तर २५ खासगी सावकारांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एकाच कुटुंबातील ९ जणांनी केली होती आत्महत्या

खासगी सावकारीतून म्हैसाळ येथे आत्महत्या केलेल्यांमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर डॉ. मणिक यल्लाप्पा वनमोरे (वय 49), पत्नी रेखा माणिक वनमोरे (45), मुलगा माणिक आदित्य वनमोरे (15), मुलगी प्रतिभा माणिक वनमोरे (21), शिक्षक पोपट यल्लाप्पा वनमोरे (52), त्यांची पत्नी संगीता पोपट वनमोरे (48), मुलगा शुभम पोपट वनमोरे (28) आणि त्यांची मुलगी अर्चना पोपट वनमोरे (30) व आक्काताई यल्लाप्पा वनमोरे (वय 72, सर्व रा. नरवाड रस्ता, म्हैसाळ) यांचा समावेश आहे.

का केली आत्महत्या ?

डॉ. माणिक वनमोरे हे खासगी पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. त्यांचे बंधू पोपट वनमोरे हे रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक होते. या दोघा भावांनी गावातील काही खासगी सावकार तसेच ओळखीतील काही जणांकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाची वनमोरे कुटुंबास वेळेत परतफेड करता आली नाही. त्यामुळे सावकारांसह संबंधितांनी या कुटुंबांकडे वसुलीसाठी तगादा लावला होता. याला कंटाळून या कुटूंबाने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

हेही वाचलंत का?

Back to top button