सांगली : बिरनाळ तलावात वर्षातून चार वेळा पाणी सोडण्याचा निर्णय : आमदार सावंत | पुढारी

सांगली : बिरनाळ तलावात वर्षातून चार वेळा पाणी सोडण्याचा निर्णय : आमदार सावंत

जत (सांगली): पुढारी वृत्तसेवा : शहरातील नागरिकांना पाणी मुबलक मिळावे, या हेतूने मुंबई मंत्रालयात बैठक झाली. शहराच्या नळपाणी पुरवठा योजनेकरिता बिरनाळ तलावामध्ये पाणी आरक्षित करण्याबाबत मंत्रालयात मुंबई येथे बैठक पार पडली. तसेच तालुक्यातील १२ तलावांना म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी जाऊ शकते. त्यातून २९ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. याबाबतसुद्धा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली.

आ. सावंत म्हणाले, सततच्या पाठपुराव्यामुळे मंत्रालयात जलसंपदामंत्री जयंत पाटील, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, संबंधित विभागाचे सचिव, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. म्हैसाळ योजनेतून बिरनाळ तलाव वर्षातून दोन वेळा भरला जात होता. मात्र मुबलक पाण्यासाठी वर्षातून ४ वेळा तलाव भरण्याबाबतचा निर्णय बैठकीत झाला. त्यामुळे शहरासाठीच्या नवीन नळपाणीपुरवठा योजनेतील कामातील एक महत्वाचा टप्पा पार पडला. शहराच्या वाढीव लोकवस्तीसह संपूर्ण शहरास पिण्याचे पाणी कमी पडणार नाही.त्यामुळे शहराचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.

तसेच तालुक्यातील १२ तलावांना म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी जाऊ शकते. त्यातून २९ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. याही विषयावर बैठकीत चर्चा झाली. या गावांना पाण्याची उपलब्धता होण्यासाठी तलावांची दुरुस्ती करून लवकरच योजनेचे पाणी सोडण्याबाबत नियोजन करण्याचे आदेश मंत्र्यानी दिले.

या बैठकीस जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिनकर खरात, जत नगरपरिषद जतचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे, जिल्हा बँक संचालक सरदार पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, माजी नगरसेवक निलेश बामणे आदी उपस्थित होते.

Back to top button