‘डब्ल्यूएचओ’ बदलणार ‘मंकीपॉक्‍स’चे नाव, जाणून घ्‍या काय आहे कारण? | पुढारी

'डब्ल्यूएचओ' बदलणार 'मंकीपॉक्‍स'चे नाव, जाणून घ्‍या काय आहे कारण?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
जागतिक आरोग्‍य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मंकीपॉक्‍स विषाणूबद्‍दल पुन्‍हा एकदा जगाला सतर्क केले आहे. तसेच आता या विषाणूचे नाव बदलण्‍याचा विचार केला जात आहे. यासंदर्भात ‘डब्ल्यूएचओ’ प्रमुख डॉ. टेड्रोस अॅधानोम गेब्रयसस यांनी म्‍हटलं आहे की, आम्‍ही तज्‍ज्ञांच्‍या सल्‍लाने मंकीपॉक्‍स विषाणूचे नाव बदलण्‍यावर काम करत आहेत. लवकरच आम्‍ही या विषाणूच्‍या नव्‍या नावाची घोषणा करु.

आफ्रिकेमधील ‘डब्ल्यूएचओ’चे संचालक इब्राहिम सोसो फाल यांनी म्‍हटलं आहे की, मंकीपॉक्‍स विषाणूचा वाढता संसर्ग हा चिंताजनक आहे. याचा प्रसार जगभरातील बहुतांश देशांमध्‍ये झाल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. त्‍यामुळेच आपत्तकालीन बैठक बोलविण्‍यात आली आहे. परिस्‍थिती हाताबाहेर जाण्‍याआधीच खबरदारीचा उपाय म्‍हणून आम्‍ही या बैठकीत चर्चा करणार आहोत.

भेदभावरहित नाव ठेवण्‍यावर भर

मंकीपॉक्‍सचे नाव बदलण्‍यासाठी आफ्रिकेसह जगभरातील ३० शास्‍त्रज्ञांचा समिती निर्णय घेणार आहे. सध्‍या तरी जगातील विविध देशांमध्‍ये पसरत असलेल्‍या मंकीपॉक्‍सच्‍या विषाणूवर शास्‍त्रज्ञ सखाेल संशाेधन  करत आहेत. विषाणूमधील झालेले परिवर्तन हे मूळ आफ्रिका, पश्‍चिम आफ्रिका किंवा नायजेरियातील विषाणूपासून झाले आहे का, यावरही संशोधन सुरु
असल्‍याचे ‘डब्ल्यूएचओ’च्‍या शास्‍त्रज्ञांनी स्‍पष्‍ट केले. तटस्‍थ आणि भेदभाववरहित विषाणूचे नाव ठेवणे अधिक उचित होणार आहे. नवीन प्रस्‍तावानुसार विषाणूच्‍या १, २ आणि ३ वर्गानुसार विषाणूला नाव देण्‍यात येईल, असेही ‘डब्ल्यूएचओ’ने स्‍पष्‍ट केले आहे.

‘डब्ल्यूएचओ’ने बोलवली आपत्तकालीन बैठक

जगातील विविध देशांमध्‍ये मंकीपॉक्‍स विषाणू बाधित रुग्‍णांची संख्‍या वाढत आहे. ‘डब्ल्यूएचओ’ने बोलवलेल्‍या आपत्तकालीन बैठकीत या विषाणूला सार्वजनिक आरोग्‍यासाठी धोकादायक घोषित करण्‍याबाबत विचारमंथन होणार आहे. आतापर्यंत अमेरिका, कॅनडा, भारत, ऑस्‍ट्रेलिया, युरोप आणि ब्राझीलसह ३९ देशांमध्‍ये मंकीपॉक्‍सचा फैलाव झाला आहे. यामुळे या विषाणूचा समावेश हा कोरोना महामारी, पोलिओ आणि इबोला सारख्‍या गटात करावा का याबाबत विचार सुरु आहे. याबाबत पुढील आठवड्यात निर्णय होणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button