जत : उटगीत सोसायटीच्या निवडणूक वादातून दोन गटात हाणामारी | पुढारी

जत : उटगीत सोसायटीच्या निवडणूक वादातून दोन गटात हाणामारी

जत; पुढारी वृत्तसेवा : उटगी (ता. जत) येथील सर्व सेवा सोसायटी निवडणुकीच्या निकालानंतर विजयी गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला. यावेळी पराभूत गटाच्या कार्यकर्त्याच्या अंगावर गुलाल पडला. याच कारणावरून दोन गटातील बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. पोलीस उपधीक्षक रत्नाकर नवले यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत जमावाला शांततेचे आवाहन केले. चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवल्याने गावातील तणावग्रस्त वातावरण शांततामय झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी सांगलीहून आरसीपीची एक तुकडी तैनात केली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, उटगी सर्व सेवा सोसायटीचे मतदान शनिवारी शांततेत पार पडले होते. माजी सभापती बसवराज बिराजदार व माजी सरपंच भिमांना बिराजदार या दोन्ही गटात चुरस होती. रविवारी जत येथे मतमोजणी झाली. यात भाजपचे माजी सभापती बसवराज बिराजदार गटाने एक हाती सत्ता मिळवली. दरम्यान विजयी उमेदवारांनी जत येथे मतमोजणीच्या ठिकाणी गुलाल उधळत असताना पराभूत गटातील कार्यकर्त्याच्या अंगावर चुकून गुलाल पडला. याच कारणावरून दोन्ही गटात बाचाबाची झाली व किरकोळ हाणामारी झाली.

याबाबत पोलिसात रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल नव्हता. त्यानंतर दुपारी १ वाजता उटगी येथे गावात दोन्ही गटाचे कार्यकर्ते आल्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले होते. विजयी उमेदवारांनी जल्लोष व मिरवणूक काढलेली होती. यावेळी पराभूत गटाने ही मिरवणुक रोखली. दोन्ही गटातील एक हजारहून अधिक जमाव आमने-सामने आल्याने काही काळ वातावरण तणावाचे बनले.

याबाबतची माहिती पोलीस उपधिक्षक रत्नाकर नवले यांना समजताच फौजफाट्यासह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. पोलीस बंदोबस्त व जादाची पोलीस कुमक मागवली व दिवसभर परिस्थिती शांततेत परिस्थिती हाताळली. नवले यांनी केलेल्या शांतता आवाहनाला प्रतिसाद मिळाला. ते उटगी येथे दिवसभर थांबून कार्यकर्त्यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होते. दरम्यान सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सांगलीतून आरसीपीची एक तुकडी मागवण्यात आली होती. सायंकाळी दोन्ही गटातील वाद निवळल्याने वातावरण शांततामय झाले होते.

रविवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस उपाधीक्षक अधिकारी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक राजेश रामघारे,सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहिते ,पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात, आगतराव मासाळ, रामेश्वर पाटील , सुनील व्हनखडे , विजय अकुल याांनी वातावरण शांतमय हाताळले. रात्री ९वाजता गावातील सर्व व्यवहार सुरळीत होते.

हेही वाचा

Back to top button