मिरज ः पुढारी वृत्तसेवा : प्रेमसंबंधाला विरोध केल्याने तरुणीने गळफास लावून घेतल्याच्या समजातून एकाने चिडून प्रियकराच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याचा खून केला. प्रभू पोपट सूर्यवंशी (वय 22, रा. लंगरपेठ, ता. कवठेमहांकाळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दि. 9) गुंडेवाडी (ता. मिरज) येथे घडली. तीन दिवस मृत्यूशी झुंज देणारा तरुण शनिवारी रात्री उशिरा मरण पावला. याप्रकरणी संशयित सुनील ऊर्फ सोन्या शिवाजी शिंदे (रा. इंदिरानगर फाटा, मिरज, मूळ रा. लंगरपेठ) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, संशयित सुनील शिंदे हा मिरजेत इंदिरानगर येथे राहतो. प्रभू हा सुनील याचा खास मित्र होता. तो मिरजेत सुनील याच्या एका नातेवाईकाच्या हॉटेलमध्ये काम करीत होता. त्यावेळी त्याचे एका तरुणीशी सूत जुळले होते. प्रभू याने सुनील याला प्रेमप्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर हे प्रकरण मिटविण्यासाठी सर्वजण एकत्र जमले. त्यावेळी प्रभू याने "आमच्या दोघांचे लग्न लावून द्या, नाहीतर आम्ही दोघेही आत्महत्या करू", अशी धमकी दिली होती.
मात्र या लग्नास सर्वांचा विरोध असल्याने सुनील याने प्रभू यास "तू गावी चल", असे म्हणून त्याला लंगरपेठला घेऊन निघाला होता. त्यावेळी प्रभू याचा नातेवाईक ज्ञानदेव सूर्यवंशी हा देखील त्यांच्याबरोबर होता. हे तिघेही गुंडेवाडी येथे पोहोचले असता त्या तरुणीने गळफास लावून घेतल्याची खोटी माहिती सुनील याला फोनवरून मिळाली. त्यावेळी या रागातून सुनील याने "तुझ्यामुळे तरुणीने गळफास लावून घेतला, तुला जिवंत सोडणार नाही", असे म्हणून प्रभू याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले.
गंभीर जखमी झालेल्या प्रभू याला त्याचा नातेवाईक ज्ञानदेव याने मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु तीन दिवस मृत्यूशी झुंज देऊन देखील अखेर प्रभू मरण पावला. या प्रकरणी सुनील शिंदे याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मिरज ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
प्रेमसंबंधामुळे खास मित्र झाला पक्का वैरी!
प्रभू आणि संशयित सुनील हे दोघे खास मित्र होते. परंतु प्रभूचे एका तरुणीसोबत प्रेमाचे सूत जुळले आणि इथेच दोघांच्या खास मैत्रीत ठिणगी पडली. प्रेमसंबंधामुळे जीवाभावाचे मित्र पक्के वैरी बनले. याच कारणातून वाद पराकोटीला गेला आणि सुनील याने प्रभू याच्यासोबत असलेल्या मैत्रीला त्याचा खून करून पूर्णविराम दिला.