औरंगाबाद : सात हजार रुपयांच्‍या उधारीसाठी चक्क दुकानासमोर ठेवला बॉम्ब | पुढारी

औरंगाबाद : सात हजार रुपयांच्‍या उधारीसाठी चक्क दुकानासमोर ठेवला बॉम्ब

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : कन्नडमधील एका फर्निचरच्या दुकानासमोर ९ जून रोजी गावठी बॉम्ब आढळला होता. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. ग्रामीण पोलिसांनी ४८ तासांच्या आत या प्रकरणाचा उलगडा केला. सात हजार रुपयांच्या आर्थिक देवाण-घेवाणीच्या प्रकरणातून धडा शिकविण्यासाठी आरोपीने हा प्रकार केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी संबंधिताला शनिवारी रात्री (दि. १२ जून) अटक केली.

रामेश्वर ज्ञानेश्वर मोकासे (२६, रा. म्हाडा कॉलनी, कन्नड) असे आरोपीचे नाव आहे. तो इलेक्ट्रिक रिपेअरींगची कामे करतो. त्याचे हिवरखेडा रोड, कन्नड येथे दुकान आहे. आरोपीला तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव यांनी न्यायालयात हजर केले असता १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

९ जूनला मोबाइलच्या रिकाम्या बॉक्समध्ये कमी तीव्रतेचा पाईप सदृश्य इम्प्रोवाईज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस मिळून आला होता. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने सुरक्षितपणे हाताळून निर्जनस्थळी नेत हा आयईडी नष्ट केला होता. दरम्यान, हे गंभीर प्रकरण असल्याने पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याच्या कलमान्वये कन्नड ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

नेमके प्रकरण काय?

आरोपी रामेश्वर मोकासे हा बारावी पास आहे. त्याने दिनेश राजगुरु (रा. शांतीनगर, कन्नड) यांच्यासोबत पूर्वी एक काम केले होते. त्याला सात हजार रुपयांचे बिल राजगुरुने दिले  होते. दोन वर्षे रामेश्वरने दिनेशला उधार दिलेले पैसे मागत हाेता; पण त्याने पैसे काही दिले नाहीत. त्याचा चुलत भाऊ किरण राजगुरुला मध्यस्थी करायला सांगितले. तरीही, काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे आता दिनेशला धडा शिकवायचाच, असे मनोमन ठरवून रामेश्वरने दिनेशचे नुकसान करण्यासाठी कमी तीव्रतेचा आयईडी बॉम्ब बनविला.दुकान बंद असताना एका मोबाइलच्या खोक्यात दुकानासमोर ठेवला होता. हे खोके हाताळल्यानंतर त्याचा स्फोट होऊन एखादा व्यक्ती जखमी होईल, एवढी त्याची तीव्रता ठेवण्यात आली होती, असे तपासात समोर आल्याचे पोलिस अधीक्षक कलवानिया म्हणाले.

अशी केली अटक

पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले होते. कन्नड शहर, ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा यांची चार पथके तपासासाठी नेमली . तज्ज्ञ अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही त्यात लक्ष घालण्याच्या सूचना केल्या होत्या. सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल लोकेशन, डम डाटा आदींचा अभ्यास करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रामेश्वर मोकासेचे नाव समोर आणले. त्याची चौकशी केल्यावर तो बोलता झाला. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव, पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे, रवींद्र तळेकर, विजय जाधव, प्रदिप ठुबे, सतिष बडे, सोनार, सय्यद झिया यांनी केली.

इस्त्रोमध्ये जाण्याचे स्वप्न

आरोपी रामेश्वर हा टेक्नोसॅव्ही आहे. त्याला इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात प्रयोग करण्याची आवड आहे. रामेश्वरचे भाऊदेखील उच्चशिक्षित आहेत.  त्याचे वडील एसटी महामंडळात इलेक्ट्रिशियन म्हणूनच काम करतात. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात आवड असलेल्या रामेश्वरला कधीकाळी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) येथे काम करण्याचीही इच्छा होती. त्याने त्यासाठी अर्ज प्रक्रियाही केली होती, परंतु त्याला यश आले नाही.

हेही वाचलंत का?

Back to top button