

कवठेमहांकाळ (सांगली) ; पुढारी वृत्तसेवा : कवठेमहांकाळ तालुक्यातील लांडगेवाडी फाट्यावर चार अज्ञात चोरट्यांनी स्विफ्ट डिझायर गाडी अडवून चाकू -पिस्तूल चा धाक दाखवत तीन लाख एक हजार २०० रुपये रक्कम लंपास केली. हा प्रकार मंगळवारी (दि.१०) सायंकाळी सव्वासहा ते रात्री नऊच्या दरम्यान घडला.
लुटप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश साबू मादीगर वय ३६ (रा. शंभर फूटी रोड सांगली) यांनी याबाबत कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी ; गणेश साबू मादीगर हे स्विफ्ट (एम. एच. १० डीएल – ९६४८) गाडीतून जात होते.
यावेळी लांडगेवाडी फाट्यावर आले असताना दोन दुचाकीवरुन चार अनोळखी इसम आले.
मास्क परिधान केलेल्या चौघांनी स्विफ्ट गाडी अडवून चालक राजाराम शिंदे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
चालक राजाराम शिंदे यांना गाडीत घालून चाकू आणि पिस्तूलचा धाक दाखवला.
ती गाडी नागज, आरेवाडी, नांगोळे, रांजणी, खिळेगाव, सलगरे यामार्गे आरग-बेडगच्या मध्यभागी एका निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेले.
प्रवासात गणेश मादीगर यांचेकडील तीन लाख एक हजार २०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
दरम्यान लूटप्रकरणाचा गुन्हा दाखल झालेनंतर जत उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांनी लांडगेवाडी येथे भेट देऊन पाहणी करुन पुढील तपासाबाबत मार्गदर्शन केले.