आटपाडीत लवकरच नगरपंचायत; मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा | पुढारी

आटपाडीत लवकरच नगरपंचायत; मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : आटपाडी येथे लवकर नगरपंचायत अस्तित्वात येईल, अशी घोषणा खुद्द नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याने आटपाडीतील अनेक वर्षे सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

शिवेसेनेच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, खा.धैर्यशील माने,आ.अनिल बाबर, सांगोल्याचे आ.शहाजीबापू पाटील, शिवसेनेचे उपनेते प्रा.नितीन बानूगडे-पाटील, जि. प. माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते, तालुकाध्यक्ष साहेबराव व मान्यवर उपस्थित होते.

शेतकरी मेळाव्यात आ.अनिल बाबर यांनी तालुक्यातील बहुसंख्य गावात कृष्णेचे पाणी आले आहे. आटपाडी तालुका विकासाबाबत प्रगती पथावर आहे. मात्र शहरातील नागरिकांना सुविधा देण्यासाठी ग्रामपंचायत ऐवजी नगरपरिषदेची आवश्यकता आहे. पण, तांत्रिक अडचणीमुळे तात्काळ नगरपंचायत व्हावी आणि त्याची तात्काळ घोषणा करावी अशी मागणी केली.

त्यानंतर मंत्री शिंदे यांनी लवकरच नगरपंचायत अस्तित्वात येईल आणि शहराच्या विकासाला निधी पडू देणार नाही शहर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे रोल मॉडेल करू अशी ग्वाही दिली.

यावेळी मंत्री एकनाथ शिंदे यांनी डाळींब पिकावर आलेल्या पिन होल बोर रोगावर कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्यासोबत उपाययोजनेबाबत बैठक घेण्याचे आणि दुष्काळी तालुक्यांसाठी वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत शासनस्तरावर विचार केला जाईल असे आश्वासन दिले.

आ. अनिल बाबर यांनी कामाचं श्रेय घेणाऱ्यांना फटकारत माझं काम जनतेला माहीत असल्याचे सांगितले. आटपाडी तालुक्यात दुष्काळ आणि टँकरच्या पाण्यावर मोठया कष्टाने आलेल्या डाळींब बागा पिन होल रोगाने उध्वस्त झाल्या आहेत. त्यावर उपाययोजना केल्यास आटपाडीचा कॅलिफोर्निया होईल, असा विश्वास व्यक्त केला.

शंभूराजे देसाई म्हणाले, बाबर पाणीदार आमदार आहेत. पाणी योजनांच्या वीज बिलाचा प्रश्न त्यांनी ८१-१९ फॉर्म्युला वापरून सोडवला. टेंभू सहाव्या टप्प्याची पोस्टर कोणीही लावली तरी हे काम देखील बाबर यांनीच केल्याचे स्पष्ट केले.

अनिल बाबर- तानाजी पाटील गुरू शिष्य प्रेमाचे अनोखे उदाहरण : एकनाथ शिंदे

जनतेच्या कामासाठी झटणारा अनिल बाबर यांच्यासारखा आमदार तुम्हाला मिळाला हे मतदारसंघाचे भाग्यच आहे. तसेच आमदारांना जनतेचे मन जिंकणारा तानाजी पाटील यांच्या सारखा सच्चा कार्यकर्ता मिळाला हे गुरू शिष्याचे प्रेमाचे अनोखे उदाहरण असल्याचे मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांचा वाढदिवसा निमित्त बोलताना मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार अनिल बाबर आणि तानाजी पाटील यांच्या विषयी गौरवोद्गार व्यक्ते केले. यावेळी मंत्री शिंदे म्हणाले, आ.अनिल बाबर यांच्या आग्रहास्तव लोकांनी अध्यक्ष म्हणून बिरुदावली दिलेल्या तानाजी पाटील यांच्या वाढदिवसाला येण्याची संधी मिळाली.

Back to top button