Covid Booster Dose : परदेशवारी करणाऱ्या भारतीयांना संबंधित देशात बूस्टर डोस घेण्याचे निर्देश | पुढारी

Covid Booster Dose : परदेशवारी करणाऱ्या भारतीयांना संबंधित देशात बूस्टर डोस घेण्याचे निर्देश

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या बुस्टर डोस (Covid Booster Dose) संबंधी सरकारने महत्वाचे दिशानिर्देश जारी केले आहेत. विदेशात जाणाऱ्या भारतीय आवश्यकता पडल्यास संबंधित देशाच्या दिशानिर्देशानूसार कोरोना विरोधातील बूस्टर डोस घेवू शकतात, असे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून बुस्टर डोस संबंधी मापदंडांमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय लसीकरणासंबंधी राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समुहाच्या (एनटीएजीआय) शिफारसीच्या आधारावर घेण्यात आला आहे.

विदेशात जाणारे भारतीय तसेच विद्यार्थी संबंधित देशाच्या दिशानिर्देशांनूसार खबरदारी म्हणून बुस्टर डोस (Covid Booster Dose) घेवू शकतील. ही सुविधा लवकरच कोव्हिन अँपवर देखील उपलब्ध होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी समाज माध्यमांवरून दिली आहे.

भारतीयांसाठी दुसऱ्या आणि बूस्टर डोस (Covid Booster Dose) दरम्यानचे अंतर नऊ महिन्यांवरून कमी करण्याची आवश्यकता असल्याची शिफारस एनटीएजीआय कडून करण्यात आली होती. पंरतु, एनटीएजीआय कडून सर्वांसाठीच बूस्टर डोससाठीचा कालावधी नऊ महिन्याचे अंतर कमी करून सहा महिन्यांवर आणण्याची शिफारस करण्यात आलेली नाही. १८ वर्षांहून अधिक वयोगटातील नागरिक दुसऱ्या लसीनंतर ९ महिन्यांनी बुस्टर डोस घेवू शकतील.

नोकरी, शैक्षणिक प्रवेश, खेळ तसेच भारतीय प्रतिनिधिमंडळाचे सदस्य म्हणून विदेशात जाणाऱ्यांना बूस्टर डोससाठी अनेक अर्ज प्राप्त झाले होते. याच आधारे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. देशात १० एप्रिलपासून खासगी लसीकरण केंद्रांवर १८ वर्षांहून अधिक वयोगटातील सर्व पात्र नागरिकांना खबरदारी म्हणनू बूस्टर डोस लावला जात आहे.

Back to top button