जालन्यात शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यावरुन दोन गटांत दगडफेक | पुढारी

जालन्यात शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यावरुन दोन गटांत दगडफेक

भोकरदन (जि. जालना); पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील चांधई एक्को गावात आज गुरुवारी (ता.१२) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा काढण्यावरुन दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. गावाच्या कमानीला गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्यात यावे यावरुन दोन गटात हाणामारी, जाळपोळ झाली . अखेर शिवाजी महाराज यांचा पुतळा प्रशासनाने काढला आहे.

एक गट गोपीनाथ मुंडे यांचे नाव गावाच्या कमानीला देण्यात यावे, अशी मागणी करत होता. तर दुसरा गट छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कमानीला कायम ठेवावे, अशी मागणी करत होता. शिवाजी महाराज यांचा पुतळा काढण्यासाठी आलेल्या जेबीसी व क्रेन यंत्रावर दगडफेक करण्यात आली. पोलीस प्रशासनातर्फे जमावाला शांत करण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला. यावेळी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली होती. अग्निशमन दलाच्या सहाय्याने शिवाजी महाराज यांचा पुतळा काढण्यात आला आहे.

अग्निशामक दलाच्या दोन गाड्या फोडल्या

जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या आदेशानुसार भोकरदनसह जालना येथून अग्निशामक दलाच्या दोन गाड्या बोलावण्यात आल्या होत्या. यावेळी संतप्त जमावाने दोन्ही गाड्यांवर दगडफेक केली. झालेल्या दगडफेकीत दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले असून भोकरदन येथील अग्निशामक दलाचे चार कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे. यावेळी अग्निशमन विभाग प्रमुख भूषण पळसपगार, वाहन चालक सी. आर. सरकटे, फायरमन वैभव पुणेकर व रईस काद्री हे अग्निशामक दलाचे कर्मचारी जखमी झाले आहेत.

भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को गावात दोन समाजात झालेल्या वादामुळे गावात तणावाचे वातावरण असून प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या तरीही परिस्थिती आटोक्यात येत नसल्यामुळे पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याचेही समजते.

जमाव काबूत येत नसल्यामुळे तातडीने एसआरपीएफची एक तुकडी बोलावून तैनात करण्यात आली आहे. गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहुरे हे घटनास्थळी ठाण मांडून असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button