सांगली : शिक्षणाधिकार्‍यासह दोघांची कसून चौकशी | पुढारी

सांगली : शिक्षणाधिकार्‍यासह दोघांची कसून चौकशी

सांगली ः पुढारी वृत्तसेवा पदवीधर वेतणश्रेणी मान्यता प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तीन शिक्षकांकडून लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेला जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे व अधीक्षक विजयकुमार सोनवणे या दोघांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कसून चौकशी सुरू आहे.

शुक्रवारी रात्री या दोघांना एक लाख 70 हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते. दोघांच्या घरझडतीत 13 लाख रुपयांची रोकड सापडली होती. यातील दहा लाखांची रोकड कांबळेच्या घरात सापडली होती. एवढी मोठी रक्कम आली कोठून? याबद्दल कांबळेकडे कसून चौकशी केली जात आहे. लवकरच सर्व बाबींचा उलघडा केला जाईल, असे पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे यांनी सांगितले.

कांबळे व सोनवणेची स्वतंत्रपणे चौकशी केली जात आहे. जप्त रोकडबाबत दोघेही वेगवेगळी उत्तरे देत आहेत. त्यांची आणखी कुठे मालमत्ता आहे का? याचाही शोध घेतला आहे. सोमवारी (दि. 9) लाचलुचपत विभागाचे पथक जिल्हा परिषदमध्ये जाऊनही चौकशी करणार आहे.

कांबळे व सोनवणे या दोघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. सोमवारी कोठडीची मुदत संपणार आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात उभे केले जाणार आहे. दोघांवर करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांना सादर केला जाणार आहे.

कांबळे हा लवकरच सेवानिवृत्त होणार होता. सोनवणे हा त्याच्यासाठी काम करायचा, अशी माहिती लाचलुचपत विभागाच्या चौकशीतून पुढे आली आहे. दि. 26 एप्रिलरोजी या दोघांविरुद्ध तक्रार दाखल झाली होती. तेव्हापासून लाचलुचपतचे पथक या दोघांच्या मागावर होते, पण ते चकवा देत होते. अखेर शुक्रवारी रात्री दोघेही जाळ्यात सापडले.

हेही वाचलतं का?

Back to top button