इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलची लोकप्रियता घटली! | पुढारी

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलची लोकप्रियता घटली!

मुंबई : वृत्तसंस्था ; इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2022 च्या टीव्ही रेटिंगमध्ये घसरण सुरूच आहे. निम्म्याहून अधिक सामने झाले असून संघ प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्राप्त माहितीनुसार आयपीएल 2022 च्या चौथ्या आठवड्यात टीव्ही रेटिंग 35 टक्क्यांनी कमी झाले आहेे. बडे संघ आणि नामांकित खेळाडूंचे दारुण अपयश हे यामागील मुख्य कारण ठरले आहे.

आयपीएलच्या इतिहासात कधीच इतके कमी टीव्ही रेटिंग आले नव्हते. यावेळी बहुतांश सामने सायंकाळी होत आहेत. तरीही टीव्ही रेटिंगमध्ये एवढी घसरण होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. प्रारंभीच्या चार आठवड्यांचा विचार केला तर आयपीएलच्या टीव्ही रेटिंगमध्ये 30 टक्के घट नोंदवली गेली होती.

नुकतेच आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी म्हटले होते की होय, टीव्ही रेटिंगमध्ये घसरण झाली आहे. मात्र, यामुळे आयपीएलच्या लोकप्रियतेवर फारसा परिणाम झालेला नाही. पटेल यांनी दावा केला होता की, लोक आता गटागटाने रेस्टॉरंट आणि बारमध्ये जाऊन सामने बघत आहेत.

दिग्गज संघांच्या पराभवांमुळे चाहते निराश

कोरोनाचे सावट बर्‍यापैकी दूर झाल्यानंतर यंदाच्या आयपीएलमध्ये सुरुवातीला मोठा उत्साह दिसून आला. मात्र, चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांचे आव्हान जवळपास संपुष्टात आल्याचे निदर्शनाला आल्यानंतर या संघांचे चाहते निराश झाले. मुंबईने तब्बल पाच वेळा तर चेन्नईने चार वेळा आयपीएलचे अजिंक्यपद पटकावले आहे. यंदासुद्धा स्पर्धा सुरू होण्याआधी याच दोन संघांकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात होते.

आयपीएलचा 15 वा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी अत्यंत निराशाजनक ठरला आहे. संघाला एक-दोन नव्हे तर सलग 8 पराभवांना सामोरे जावे लागले. मुंबईने आतापर्यंत खेळलेल्या 10 पैकी 2 सामने जिंकले असून गुणतालिकेत ते 10व्या स्थानावर आहे. मुंबईने उर्वरित 4 सामने जिंकले तर 12 गुणांपर्यंतच मजल मारता येईल. त्याच वेळी, त्याचा नेट रन रेट देखील -0.725 आहे.

चेन्नईने आतापर्यंत १० सामने खेळले आहेत. त्यातील ३ सामन्यात त्यांनी विजय मिळवता आला. गुणतालिकेत ते सध्या सहा गुणांसह नवव्या स्थानावर आहे.

वास्तवात मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाला गेला असून चेन्नईची परिस्थितीदेखील दयनीय म्हणावी अशीच बनली आहे. महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा हे दोघेही स्टार खेळाडू आहेत. मात्र, दोघांनाही आपल्या कामगिरीला न्याय देता आलेला नाही. मुंबई व चेन्नई या दोन्ही संघांना सूर गवसला, पण उशिरा. तोपर्यंत त्यांचे आव्हान संपुष्टात आले होते. इंडियन प्रीमियर इंडियन प्रीमियर लीग च्या लोकप्रियतेत घट होण्याची अशी अनेकविध कारणे आहेत.

Back to top button