Saccharin : खाद्यपदार्थातील 'सॅकरीन'च्या वापरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात - पुढारी

Saccharin : खाद्यपदार्थातील 'सॅकरीन'च्या वापरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

बीड : गजानन चौकटे : वाढत्या उन्हाच्या प्रकोपापासून बचाव करण्यासाठी नागरिकांची शीतपेयांकडे पाऊल वळू लागली आहेत. उन्हाळ्यात शीतपेयांची वाढती मागणी लक्षात घेता व्यावसायिकांनी नफा कमविण्याच्या दृष्टीने शीतपेयांचा गोडवा वाढविण्यासाठी सॅकरीनचा  (Saccharin) सर्रास वापर सुरू केला आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर दुपारच्या वेळी शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. दरम्यान, उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांकडून शीतपेय, बर्फ गोळा, आईस्क्रीम, लस्सी यासारख्या पदार्थांना पसंती दिली जात आहे. या शीतपेयांची वाढती मागणी लक्षात घेता व्यावसायिकांकडून साखरेऐवजी सॅकरीनचा वापर करत आहेत. त्यामुळे शीतपेयाचा गोडवा वाढत असला तरी केमिकलयुक्त सॅकरीनचा  (Saccharin) नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे.

Saccharin : सॅकरीनचे आरोग्यावर विपरित परिणाम

सॅकरीनचा गोडवा हा साखरेपेक्षा २०० ते ७०० पट अधिक असतो. सॅकरीनचे दुष्परिणाम माहिती नसल्याने अनेकजण क्षुल्लक लाभासाठी सॅकरीनचा अतिरेकी वापर करत आहेत. या अतिरेकी वापरामुळे असे सॅकरीनचे पदार्थ खाण्यात आल्याने किंवा पिण्यात आल्याने मूत्राशयाचा कर्करोगाचा धोका संभवतो.

साखरेपेक्षा पडते स्वस्त

शीतपेय तयार करण्यासाठी रंगासोबतच फळाचा इसेन्स आणि मुख्य घटक साखर वापरण्यात येते. मात्र, साखरेच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडत असल्यामुळे व त्यातच स्पर्धेमुळे स्वस्तात शीतपेय विकण्यासाठी व्यावसायिकांनी साखरेला पर्याय शोधून काढला आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

बर्फ गोळा, सरबत, लस्सी, आईस्क्रीम यासारख्या पदार्थामध्ये सॅकरीनचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु, अन्न व औषध प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. अद्यापपर्यंत शहर आणि जिल्ह्यातील एकही नमुना घेण्यात आल्याचे वा कोणावर कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. व्यावसायिक सर्रासपणे साखरेऐवजी सॅकरीनचा वापर करत आहेत. त्यामुळे शीतपेयाचा गोडवा वाढत असला, तरी केमिकलयुक्त सॅकरीनमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

सॅकरीन छोट्या गोळ्या, चूर्ण किंवा द्रव स्वरुपात तयार केले जाते. याची सोडियम लवणे जलविद्राव्य असल्यामुळे खाद्यपदार्थांत व पेयांत वापरण्यास जास्त सोयीची असतात. कमी ऊष्मांक असलेली सौम्य पेये, साखररहित च्युईंग गम, जॅम, जेली, पुडिंग्ज आणि सॅलड ड्रेसिंग्ज या उत्पादनांमध्येही याचा वापर केला जातो. मेवामिठाई, औषधी रसायनांमध्येही सॅकरीन वापरता येते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी याच्या गोळ्या व द्रावणे मिळतात. सॅकरिनाच्या अतिसेवनाने कर्करोग होत असल्याची शंका आल्यामुळे अन्नपदार्थात ते वापरण्यास काही देशांत बंदी घालण्यात आली होती. सॅकरीनमुळे मुत्रपिंडावर परिणाम होतो. यामुळे सॅकरीनचा वापर टाळावा.
– डॉ. राम दातार, गेवराई

हेही वाचलंत का ? 

Back to top button