इस्लामपूर ः पुढारी वृत्तसेवा अंनिस कोणत्याही देवा धर्माला विरोध करीत नाही तर, देवा-धर्माच्या नावाखाली जे लोकांचे मानसिक, आर्थिक शोषण करतात, त्यांना अंनिस विरोध करते. कर्मकांडकेंद्री धर्म मानवकेंद्री करण्याचा प्रयत्न अंनिस करते, असे प्रतिपादन अंनिसचे राज्य कार्यकारी सदस्य डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले.
येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने जिल्हास्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर पार पडले. अंनिसच्या राज्य अध्यक्षा सरोज पाटील उपस्थित होत्या. डॉ. दाभोलकर यांनी 'अंनिस समजून घेताना' या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले,'भारतातील बुद्ध, महावीर, वारकरी संत आणि समाजसुधारकांची धर्मचिकित्सेची परंपरा अंनिस पुढे चालवत आहे. आजही समाजामध्ये नरबळी, करणी, भानामतीचे अघोरी प्रकार सुरू असल्यानेे अंनिस चळवळीची नितांत गरज आहे.
प्रा. प. रा. आर्डे 'वैज्ञानिक दृष्टिकोन' या विषयावर बोलताना म्हणाले, 'युरोपियन खंडात नवसुधारणा, विज्ञानाचा प्रचार झाल्यानंतर वैज्ञानिक जाणिवा लोकांच्या मनात विकसित झाल्या. निर्भीडपणे प्रश्न विचारणे, चिकित्सा करणे यातून वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होतो. या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे युरोपीयन राष्ट्रांनी आपली प्रगती केली आहे.
अंनिसचे राज्य कार्यकारी सदस्य फारुख गवंडी यांनी अंनिस शाखा कशी चालते, या विषयावर मार्गदर्शन केले. ज्येष्ठ विचारवंत माजी प्राचार्य विश्वास सायनाकर यांनी मार्गदर्शन केले. राहुल थोरात यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अलका पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एस. के. माने यांनी आभार मानले. प्रा. सचिन गरुड, डॉ. राजेश दांडगे, डॉ. संतोष खडसे, दीपक कोठावळे, प्रा.सी. जे. भारसकळे, शशिकांत बामणे, जगन्नाथ नांगरे, सीमा परदेशी, स्मिता पाटील, प्रा. पी. एच. पाटील यांनी संयोजन केले.