सांगली ः पुढारी वृत्तसेवा सांगली जिल्हा गुरुवार, दि. 5 पासून पुढील चार दिवस तापमानाने होरपळणार आहे. पारा 41 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. शनिवार, दि. 7 पासून सलग चार दिवस वादळी वार्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मार्च, एप्रिलबरोबर मे महिन्यातही कडक उन्हाळा पडत आहे. यंदा तापमानाने मागील उच्चांक मोडीत काढीत सतत चाळिशी पार केली आहे.
यामुळे जिल्ह्यात पिकांची होरपळ सुरू आहे. नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. अनेकांना उष्णतेचे विकार जडत आहेत. महिला, बालके, वृद्धांना मोठा त्रास होत आहे. प्रचंड उष्म्यामुळे लोक दुपारचे बाहेर पडत नाहीत. सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत रस्ते सुनसान पडत आहेत. उन्हापासून बचावासाठी थंडपेये, टोप्या, गॉगल, पांढरी वस्त्रे, पंखे, कुलर, एसी यांची मागणी वाढली आहे.
पुढील आठवड्यातही जिल्ह्यात उष्णतेची लहर येणार असल्याचा अंदाज आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवारपर्यंत किमान तापमान 24 ते 25 व कमाल तापमान 41-42 अंश सेल्सिअसपर्यंत जाणार आहे. वातावरण ढगाळ राहणार असून यामुळे उकाडा प्रचंड जाणवणार आहे. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवारपर्यंत वादळी वार्यासह जोरदार पाऊस व गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.