थायलंडमध्ये माकडांमधूनही फैलावत आहे मलेरिया | पुढारी

थायलंडमध्ये माकडांमधूनही फैलावत आहे मलेरिया

बँकॉक : थायलंडमधील माकडांच्या झुंडी, खास त्यांच्यासाठी आयोजित केलेली फळांची मेजवानी जगप्रसिद्ध आहे. मात्र, आता तिथे माकडांपासून चक्क मलेरिया फैलावल्याची प्रकरणे समोर आली आहेत. गेल्यावर्षी ऑक्टोबर ते मार्चदरम्यान अशी प्रकरणे वेगाने वाढत असल्याचे दिसून आले. एरव्ही डासांमुळे फैलावणारा हा रोग माकडांमुळेही फैलावत असल्याने तेथील तज्ज्ञांनी लोकांना माकडांपासून दूरच राहण्याचा सल्ला दिला आहे.

मलेरियाचा ‘प्लास्मोडियम नोलेसी’ नावाच्या प्रकाराची एकूण 70 प्रकरणे तिथे मार्चच्या अखेरपर्यंत आढळून आली. त्याआधी वर्षभर फक्त 10 प्रकरणांची नोंद झाली होती. याचा अर्थ आधीच्या तुलनेत तिथे मलेरियाची प्रकरणे वेगाने वाढत असल्याचे दिसून आले. त्यामुळे थायलंडमध्ये येणार्‍या लोकांना याबाबत सावध करण्यात आले आहे. रोग नियंत्रण विभागाचे डॉ. ओपार्ट कर्णकाविनपोंग यांनी सांगितले की हा खतरनाक परजीवी कसा फैलावत आहे हे स्पष्ट झालेले नाही.

त्याच्या संसर्गामुळे ताप, थंडी, भूक न लागणे अशी लक्षणे दिसतात. याबाबत तेथील प्रशासन सावध झाले आहे. जिथे मलेरियाग्रस्त माकडं आहेत अशा जंगलांपासून दूर राहण्याच्या सूचना पोलिसांनी पर्यटकांना दिल्या आहेत. रानोंग, सोंगखला आणि ट्राट या प्रांतातील माकडांना स्पर्श केला असेल किंवा कोणत्याही प्रकारे त्यांच्या संपर्कात आले असेल तर वैद्यकीय तपासणी व उपचार गरजेचे केले आहेत.

Back to top button