महाराष्ट्राला पुन्हा जाती-पातीच्या बेड्यात अडकवण्याचे काम : रोहित पाटील | पुढारी

महाराष्ट्राला पुन्हा जाती-पातीच्या बेड्यात अडकवण्याचे काम : रोहित पाटील

तासगाव, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राला पुन्हा एकदा जाती-पातीच्या बेड्यामध्ये अडकवण्याचे काम काही लोक करत आहेत. परंतु अशा लोकांना महाराष्ट्राची जनता थारा देणार नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली. ते सांगली येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राजकारणात नेहमी शक्तीस्थळावरच टीकेचे हल्ले होतात, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राजकारणातील शक्तीस्थळ आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सातत्याने टीका होत असते. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून या राज्यांमध्ये जातीपातीच्या आणि धर्मांच्या राजकारणाला कधीही थारा मिळालेला नाही. यापुढील काळातही या गोष्टींना राज्यातील जनता किंमत देणार नाही. समाजात अशांतता पसरवतात त्यांचा महाराष्ट्रमधील जनताच योग्य वेळी बंदोबस्त करेल असे रोहित पाटील म्हणाले.

पुढे बोलताना रोहित पाटील म्हणाले, शरद पवार हेच महाराष्ट्राचे नेतृत्व करतात. राज्याच्या विविध प्रश्नांसंदर्भात दिल्ली दरबारी त्यांनीच महत्त्वाची भूमिका नेहमी घेतलेली आहे. राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी दिल्लीमध्ये ते सातत्याने प्रयत्न करत असतात, यामुळे कुठेतरी त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून होत आहे. असे रोहित पाटील म्हणाले.

हेही वाचा  

Back to top button