वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे राज्यांना पत्र | पुढारी

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे राज्यांना पत्र

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील बहुतांश भागामध्ये उष्णतेची लाट आल्याने तापमानात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. येत्या काही दिवसांपर्यंत उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर तापमानाचा पारा ५० अंशावर जावू शकतो. अशात नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरेसे पिण्याचे पाणी, आवश्यक औषधे आणि उपकरणांची पुरेशी उपलब्धता व सज्जता ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. जास्‍त उष्‍णता असलेल्‍या भागांत गारवा देणारी उपकरणे सतत कार्यरत राहतील, याची खात्री करावी, तसेच यासंदर्भातील तयारीचा आढावा घेण्याची सूचना केंद्राकडून देण्यात आल्‍या आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकारांना पत्र लिहिले आहे. यामध्ये वाढते तापमान आणि उष्णतेची लाट लक्षात घेऊन आवश्यक तयारी करण्यास सांगितले आहे. यासाठी उष्माजन्य आजारांबाबतच्या राष्ट्रीय कृती आराखड्यातील मार्गदर्शक तत्त्वांची सर्व जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी करण्याच्या सूचना ही देण्यात आल्या आहेत.

सर्व राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये १ मार्चपासून एकात्मिक रोग निरीक्षण कार्यक्रमाच्या (IDSP) अंतर्गत उष्णतेशी संबंधित आजारांवर दैनंदिन देखरेख करणे.  आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांना उष्णतेचे आजार, त्याचे लवकर निदान, व्यवस्थापन आणि क्षमता वाढविण्याबाबत जागरुक करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत, अशी सूचना भूषण यांनी दिल्‍या आहेत.

‘आवश्यक औषधे, आयव्ही फ्लुइड्स, बर्फाची पाकिटे, ओआरएस आणि इतर सर्व आवश्यक उपकरणांच्या पुरेशा उपलब्धतेसाठी आरोग्य सुविधेच्या सज्जतेचा आढावा घ्‍यावा. सर्व आरोग्य सुविधांमध्ये पिण्याच्या पाण्याची पुरेशी उपलब्धता आणि जास्‍त उष्‍णता असलेल्‍या भागात गारवा देणाऱ्या उपकरणे सुरू ठेवावीत, असेही त्यांनी या पत्रात म्‍हटले आहे.

हेही वाचा  

Back to top button