कळंब(उस्मानाबाद), पुढारी वृत्तसेवा : उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात उष्णतेने कहर केला आहे. गेल्या 15 दिवसापासून तापमान जवळपास 40 डिग्रीच्या पुढे गेले आहे. तर या वाढत्या उन्हाचा फळ बागांना फटका बसत आहे. कळंब शहरातील दिगंबर कापसे या शेतकऱ्याची 5 एकर आंब्याची बाग उष्णतेमूळे जळून खाक झाली आहे.
तसेच या बागेला पाणी देण्यासाठी अंथरलेले ठिबक सिंचन लागलेल्या आगीत पूर्ण वितळले आहे. यामध्ये कापसे यांचे दहा लाखांचे नुकसान झाले असून जळलेल्या बागेचा पंचनामा करण्यासाठी कृषी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वाढत्या उन्हामुळे गवत पेटून आपोआप फळबागेला आग लागली असल्याचे शेतक–याचे म्हणणे आहे. तसेच वाढलेल्या तापमानामुळे बागेला लागलेली आगेची मराठवाड्यातील पहिलीच घटना आहे, असे कृषी अधिकारी म्हणाले.
दिगांबर कापसे यांच्या शेतातील अंबा पिकास लागलेल्या आगीचा व त्यामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला. पाच एकर क्षेत्रावरील आठशे झाडे फळपिकात आहेत आणि त्याचे संपूर्ण नुकसान झाले आहे. तसेच या क्षेत्रातील ठिबक व तुषार सिंचनाचे पाईप जळाली. शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार सदरील आग ही वाढलेल्या उष्णतेमुळे लागली असावी. तर यामधे आठ ते दहा लाखांचे नुकसान झाले आहे, त्यानुसार अहवाल वरीष्ठांकडे सादर करण्यात आला आहे.
-व्यंकटराव लोमटे, तलाठी कळंब