

मुंबई ; वृत्तसंस्था : महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून परतला आणि त्यानंतर लगेचच चेन्नई सुपर किंग्जचे नशीब चमकायला सुरुवात झाले आहे. चार वेळा आयपीएल विजेता कर्णधार धोनी रविवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात नाणेफेकसाठी मैदानात उतरला होता. एम.एस. धोनीला नाणेफेक करताना पाहून त्याच्या चाहत्यांना आनंद झाला. टॉस प्रेझेंटर डॅनी मॉरिसनला धोनीचा आवाज ऐकणे अशक्य झाले होते. कारण चाहते मोठ्याने आवाज करत होते. यादरम्यान धोनीने सांगितले की, तो पुढील वर्षीदेखील आयपीएल खेळणार आहे.
रवींद्र जडेजाने फॉर्मवर लक्ष केंद्रित केल्यामुळे धोनीकडे कर्णधारपद सोपवले. आयपीएलच्या आधी धोनीने जडेजाकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी जेव्हा धोनी नाणेफेकसाठी आला तेव्हा मॉरिसनने त्याला विचारले की, भविष्यात यलो जर्सी म्हणजेच चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे का?
यावर धोनीने उत्तर देताना म्हटले की, पुढच्या वर्षी म्हणजे 2023 मध्येही तुम्ही मला पिवळ्या जर्सीत पाहाल. तथापि, ही जर्सी कोणती असेल, हे येणारा काळच सांगेल. यामुळे धोनी पुढच्या वर्षीदेखील आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघासोबत असणार हे स्पष्ट झाले आहे, पण तो कोणत्या भूमिकेत असेल हे त्याने गुलदस्त्यात ठेवले आहे.
सामना संपल्यानंतर कर्णधार धोनीने संवाद साधला. त्याने फलंदाजांवर स्तुती केली. 202 ही चांगली धावसंख्या होती. जेव्हा तुम्ही अशी धावसंख्या उभारता तेव्हा गोलंदाजांसाठी ते थोडे सोपे होते, असे महेंद्रसिंग धोनी म्हणाला. मी इथे काही वेगळे केले नाही. जेव्हा तुम्ही एकाच ड्रेसिंग रूममध्ये असता तेव्हा तुम्ही त्याच गोष्टी बोलत असता.
त्यामुळे कर्णधार बदलल्याने फारसा बदल होत नाही. लक्ष्य मोठे होते, त्यामुळे चांगल्या गोलंदाजीची गरज होती. आमच्या फिरकीपटूंनी पॉवर प्लेनंतर आवश्यक धावगती वाढवण्याचे उत्तम काम केले. ही विजयाची गुरुकिल्ली होती. कारण समोरच्या संघाने 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली, पण आमच्या फिरकीपटूंनी त्यांना रोखले, असे धोनी म्हणाला.
जडेजाने कर्णधारपद सोडल्याबाबतही धोनीने भाष्य केले. मला वाटते जडेजाला गेल्या हंगामातच माहीत होते की, तो यावर्षी कर्णधार होणार आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये मी त्याचे कर्णधारपद पाहिले आणि नंतर त्याला त्यांच्या मर्जीने जबाबदारी पार पाडू दिली. मला वाटते की, कर्णधारपदाचा त्याच्या तयारीवर आणि खेळावर परिणाम होत होता. त्याचा परिणाम त्याच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावरही दिसून आला, असे निरीक्षण धोनीने नोंदवले.