

सांगली खून : सांगली येथील ज्ञानदा संजय लोकरे (रा. लक्ष्मीनगर, जुना बुधगाव रस्ता) या दोन वर्षांच्या बालिकेचा तिच्या आईनेच गळा आणि तोंड दाबून खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली.
ज्ञानदा गतिमंद असल्याने आणि तिला बोलता येत नसल्याने हे कृत्य केल्याची कबुली तिची आई रेवती संजय लोकरे (वय 28) हिने दिली आहे.
संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी रेवती हिला अटक केली आहे.
न्यायालयाने तिला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
सांगली खून : पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः ज्ञानदाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे, अशी माहिती शासकीय रुग्णालयातून संजयनगर ठाण्यातील पोलिसांना रविवारी रात्री देण्यात आली.
संजयनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक काकासाहेब पाटील यांच्या पथकाने रेवती हिला ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी केली.
त्यावेळी "मीच ज्ञानदाला एका हाताने तोंड दाबून आणि दुसर्या हाताने गळा दाबून मारले आहे"अशी कबुली तिने दिली. त्यामुळे पोलिसांनी रेवती हिला अटक केली.
ज्ञानदाचे वडील संजय अभियंता आहेत. ते पुण्यात नोकरी करतात.रविवारी रेवती हिचा दीर आणि नणंद परीक्षेसाठी कोल्हापूरला गेले होते. सासू शेजारी गेल्या होत्या.
त्यावेळी घरात कोणी नसल्याचे पाहून रेवती हिने ज्ञानदा हिला मारले अशी माहिती पोलिसांनी दिली.