kolhapur lockdown : निर्बंध शिथिलीकरणात कोल्हापूरवर अन्याय का? | पुढारी

kolhapur lockdown : निर्बंध शिथिलीकरणात कोल्हापूरवर अन्याय का?

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचा आरटीपीसीआर पॉझिटिव्हिटी रेट हा सहापेक्षा कमी आहे. तरीही नव्याने निर्बंध शिथिल करताना राज्य शासनाने कोल्हापुराला डावल्याने (kolhapur lockdown)  व्यापारीवर्गातून पुन्हा संताप व्यक्त होत आहे. कोरोना रुग्ण संख्येची टक्केवारी घटत असतानाही काढलेला शासन आदेश हा कोल्हापूवर अन्यायकारक असून, व्यापारी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

kolhapur lockdown : राज्य शासनाने सोमवारी राज्यातील 25 जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल केले. या ठिकाणी सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार आहेत. तर, दि. 4 जून ते 17 जून या कालावधीतील जे जिल्हे तिसर्‍या टप्प्यात होते ते आहे तसेच ठेवले आहेत. या ठिकाणची दुकाने सकाळी सात ते दुपारी चार या वेळेतच सुरू राहणार आहेत. तर हॉटेल व्यवसाय, नाट्यगृहे बंदच राहणार आहेत.

यापूर्वी राज्य शासनाने कोरोनाचा आरटीपीसीआर रेट दहाच्या आत आल्यास तिसर्‍या टप्प्याचे निकष ठेवले. कोल्हापूरचा रेट हा दहा टक्क्यांच्या आत आल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दुकाने सध्या दुपारी चारपर्यंत सुरू आहेत. आरटीपीसीआर रेट 5 टक्क्यांच्या आत आल्यास सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहणार आहेत.

कोल्हापुरातील चाचण्याचे प्रमाण वाढवल्याने सध्या आरटीपीसीआर रेट हा 5 टक्क्यांच्या आत आला आहे. सरासरी रेट हादेखील कमी येणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा दुसर्‍या टप्प्यात समावेश होईल, अशी अपेक्षा व्यापारी बाळगून होते.

मात्र, सोमवारी काढलेल्या आदेशाने व्यापारीवर्गातून संताप व्यक्त होत आहे. कारण, नव्या आदेशात जरी आरटीपीसीआर रेट कमी झाला तरी जिल्हा दुसर्‍या टप्प्यात येईल, असे कोठेही म्हटले नाही. तसेच, स्थानिक जिल्हाधिकारी यांनाही अधिकार दिलेले नाहीत. हीच स्थिती राहिल्यास कोल्हापुरातील दुकाने कायमच दुपारी चारनंतर बंद करायची का असा सवाल व्यपारीवर्गातून उपस्थित होत आहे.

दुकाने, हॉटेल रात्री आठ वाजेपर्यंत सुरू करण्याचे आदेश द्या : शेटे

आरटीपीसीआर रेट कमी येऊनही जर सर्व दुकाने सुरू करण्याला परवानगी दिली जात नसेल तर हा कोल्हापूरवर अन्याय आहे. आगोदरच कोरोना व महापुराने व्यापारी आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या चार वाजेपर्यंत दुकाने सुरू आहेत; पण ही वेळही दुकानांची स्वच्छता करण्यात जात आहे. सर्व दुकाने व हॉटेल सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू करण्याचे आदेश द्यावेत, यासाठी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.

Back to top button