सांगली : सांगलीला कधी लागणार संशोधन केंद्राची ‘हळद’ | पुढारी

सांगली : सांगलीला कधी लागणार संशोधन केंद्राची 'हळद’

सांगली : विवेक दाभोळे
संपूर्ण देशात होणार्‍या सहा लाख टन हळदीपैकी एक तृतीयांश म्हणजे दोन लाख टन हळदीची बाजारपेठ सांगलीत आहे. इथल्या हळदीच्या बाजारपेठेला दीडशे वर्षांची परंपरा आहे. तरीही राज्याच्या अर्थसंकल्पात मात्र हळद संशोधन केंद्र हिंगोली जिल्ह्यात उभारण्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. सांगलीत हळद संशोधन केंद्र सुरू करावे, ही फार वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, राज्य सरकारने सांगलीत हळद संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा नकारघंटा वाजविली आहे. मात्र, जिल्ह्यासह या परिसरात हळद लागवडीस असलेला अधिक वाव, अन्य राज्यांतून सांगलीत आयात होणार्‍या हळदीचे प्रचंड प्रमाण, प्रक्रिया उद्योग, विपणन आणि निर्यातीची मोठी संधी यासाठी सांगलीतच संशोधन केंद्र होणे गरजेचे होते.

सांगलीच्या हळदीला जगभरात मागणी तर आहेच. अगदी जागतिक बाजारातदेखील हळदीचा दर हा सांगलीच्या बाजारपेठेतील दरावर निश्‍चित होतो. जिल्हा दर्जेदार हळद उत्पादनासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात राजापुरी, सेल, निजामाबादी आदी वाणांची लागवड केली जाते. कृष्णाकाठच्या टापूत हळदच हळद पिकायची. आता वारणाकाठच्या अनेक गावांत शेतकरी हळदीकडे वळू लागला आहे. या उत्पादकांना अगदी लागवड, पीकवाढ, काढणी, शिजवणे, कच्ची हळद मार्केटमधील संधी, कच्ची, तयार हळद यासाठी मार्गदर्शन गरजेचे आहे. प्रस्तावित संशोधन केंद्र वसमत (जि. हिंगोली) येथे होत आहे. याचा सांगलीसाठी कितपत फायदा होणार, हा सवालच आहे.

@ हळद सांगलीची!

  • वार्षिक आवक : 20 लाख क्विंटल (2 लाख टन)
  • देशात वार्षिक आवक : 6 लाख टन
  • येथून होते आवक : आंध्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू
  • सांगलीत हळद वायदे बाजार : सन 1930 मध्ये प्रारंभ; दरासाठी जगात ख्याती
  • लागवडीसाठीचे वाण : पारंपरिक, सेलम, राजापुरी, निजामाबादी
  • एकरी उत्पादन : चांगला शेतकरी असेल तर 23 ते 26 क्विंटल

गरज याची!

  • अधिक उत्पादन देणारे नवनवीन वाण गरजेचे
  • एकरी उत्पादन वाढावे यासाठी पाठपुरावा
  • जागतिक बाजारातील हळदीचे महत्त्व, त्याचा लाभ स्थानिक शेतकर्‍यांना होण्यासाठी माहिती केंद्र
  • औषधे, प्रसाधने निमिर्र्तीच्या कोट्यवधीच्या मार्केटची संधी खुली करणे
  • केवळ उत्पादन नव्हे, तर हळद प्रक्रिया उद्योग उभारणी, नफा, संधी
  • निर्यातीतून होणारा लाभ, निर्यातीसाठी संधी

हेही वाचलत का ?

Back to top button