मलिक यांना जामीन मिळवून देण्यासाठी मागितले तीन कोटी | पुढारी

मलिक यांना जामीन मिळवून देण्यासाठी मागितले तीन कोटी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना जामीन मिळवून देण्यासाठी तब्बल 3 कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यातील संशयिताने एक मेसेज आणि ई-मेल पाठवून बिटकॉईनच्या स्वरूपात 3 कोटींची मागणी केली आहे. याबाबत नवाब मलिक यांचे पुत्र आमीर मलिक यांनी विनोबा भावेनगर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांविरुद्ध राज्य सरकार अशा घडामोडी घडत असताना मलिक यांच्या जामिनासाठी 3 कोटी रुपये किमतीचे 10 बिटकॉईन मागितल्याचा हा प्रकार समोर आला. मलिक कुटुंबीयांनी आरोपीचा मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीची माहिती पोलिसांना दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आमीर मलिक यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात, इम्तियाज नावाच्या व्यक्तीने हे पैसे मागितल्याचे निष्पन्न झाले आहे.

ई-मेलमध्ये इम्तियाजने दिलेल्या माहितीनुसार, तो नवाब मलिक यांना जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. त्यासाठी त्याला तीन कोटी रुपयांची रक्कम बिटकॉईनच्या स्वरूपात द्यावी लागेल. आरोपी इम्तियाज याने आमीर यांना दुबईतून हा संदेश आणि त्यानंतरचा ई-मेलही पाठवला होता, अशी माहिती पोलिस अधिकार्‍याने दिली आहे. दरम्यान, नवाब मलिक यांचा दाऊदशी संबंध जोडण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप मलिक कुटुंबीयांनी केला आहे.

Back to top button