रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्यास…खरंच पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार? | पुढारी

रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्यास...खरंच पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार?

युक्रेनवर रशियाच्या आक्रमणानंतर कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्याचा भारतावरही परिणाम झाला आहे. लवकरच दर कमी न झाल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू शकतात, असे मानले जात आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या निर्बंधांना सामोरे जात असलेल्या रशियाने भारताला कमी किमतीत कच्चे तेल देण्याची तयारी दर्शवली आहे. भारतही या कराराबद्दल खूप गंभीर आहे. रशियातून स्वस्त दरात कच्च्या तेलाची आवक झाल्यामुळे खरंच देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आणखी कमी होतील का? जाणून घेऊया…

कच्च्या तेलाची आयात आणि भारत

  • भारत आपल्या गरजेच्या 85 टक्के कच्च्या तेलाची आयात करतो. यापैकी 60 टक्के आखाती देशांमधून घेतले जाते.
  • त्याचबरोबर कच्च्या तेलाच्या आयातीसाठी भारत सौदी अरेबिया आणि अमेरिकेवर अधिक अवलंबून आहे.
  • याशिवाय भारत इराक, इराण, ओमान, कुवेत आणि रशियाकडूनही तेल घेतो आणि काही प्रमाणात खुल्या बाजारातूनही खरेदी करतो.
  • भारत सध्या रशियाकडून केवळ 2 टक्के कच्चे तेल आयात करतो. यासोबतच रशियाकडून दरवर्षी 3 अब्ज डॉलर्सची पेट्रोलियम उत्पादने आयात करतो. भविष्यात त्यात वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

तेल रशियाकडून खरेदी करणे कठीण का आहे?.

भारत रशियाकडून अतिशय कमी प्रमाणात तेल आयात करतो. कारण, कच्च्या तेलाचे उत्पादन घेतले जाणार्‍या प्रदेशांत बर्‍याचवेळा बर्फ गोठलेला असतो. अंतरही लांब आहे आणि सध्या युक्रेनवरील हल्ल्यांमुळे काळ्या समुद्राचा मार्ग बंद आहे. तसेच निर्बंधांमुळे पाश्चिमात्य देशांतील कंपन्या टँकरचा विमा उतरविण्याची शक्यताही कमी आहे. रशियापेक्षाही आखाती देशांतून तेल आयात करणे भारताला सोपे जाते. ते भारतात लवकर तर पोहोचतेच; शिवाय अंतर कमी असल्याने भाडेही कमी लागते. भारताने रशियामध्ये तेल आणि नैसर्गिक वायूच्या क्षेत्रात 16 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे; पण भारत ते तेल खरेदी करत नाही, तर ते इतर देशांना विकतो.

रशियाकडून तेल खरेदी केल्याने किंमत कमी होईल का?

रशियातून कच्च्या तेलाचे दोन-चार टँकर आणूनही भारताचा फायदा होणार नाही. भारत दररोज 5.2 दशलक्ष बॅरल तेलाचा वापर करत असल्याने किमती कमी होणार नाहीत. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेलाचा ग्राहक आहे. भारताने रशियाकडून एक लाख किंवा दोन लाख बॅरल तेल आयात केले, तरी भारतातील तेलाच्या किमतींवर त्याचा परिणाम होणार नाही.

भारताने रशियात 16 अब्ज डॉलर्सच्या तेल विहिरी विकत घेतल्या आहेत. हे तेल आपण तिथे विकतो. सध्या रशियन तेलाच्या किमती 40 टक्क्यांपर्यंत खाली आल्या आहेत. अशा परिस्थितीत तेथील तेल आणि वायूच्या साठ्यातील भागभांडवल खरेदी करणे स्वस्त ठरेल. तसेच ते भारताच्या दीर्घकालीन गरजा पूर्ण करेल. असे झाले तर आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेच्या निर्बंधांवर काही उपाय आहे का?

केवळ अमेरिकेत रशियाकडून तेल खरेदी करण्यावर निर्बंध आहेत. भारत सध्या रशियाकडून तेल खरेदी करू शकतो; परंतु पेमेंटमध्ये अडचण येऊ शकते. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारत आणि रशिया रुपया आणि रुबलमध्ये व्यापार करण्याऐवजी वस्तूविनिमय पद्धतीच्या धर्तीवर व्यापार करू शकतात, जसे भारताने इराणवरील निर्बंधांच्या वेळी गव्हाच्या बदल्यात तेल घेतले होते.

रशिया आणि युक्रेनमधील कराराच्या बातम्या आणि तेलाचा तुटवडा भासणार नसल्याचे अमेरिकेचे आश्वासन यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यात करार झाल्यास किमती आणखी खाली येऊ शकतात.
– नरेंद्र तनेजा, ऊर्जातज्ज्ञ

Back to top button