राजू शेट्टींची कोंडी..! देशपातळीवर नेतृत्व, होम पीचवर दुर्लक्ष | पुढारी

राजू शेट्टींची कोंडी..! देशपातळीवर नेतृत्व, होम पीचवर दुर्लक्ष

इचलकरंजी : विठ्ठल बिरंजे

माजी खासदार राजू शेट्टी सध्या चौफेर राजकीय कोंडीत सापडलेले आहेत. सतत बदलत्या राजकीय भूमिकाच त्यांना अडचणीत आणत असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. रिडालोस, महायुतीनंतर ते आता महाविकास आघाडीतून फारकत घेत आहेत. त्यामुळे आता त्यांचा नवा सहकारी कोण असेल, याकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे. याबाबत पाच एप्रिलला ते घोषणा करणार आहेत.

देशपातळीवर नेतृत्व, होम पीचवर दुर्लक्ष

शेतकर्‍यांचा एक आक्रमक चेहरा म्हणून राजू शेट्टी यांच्याकडे पाहिले जाते. सरकार कोणतही असो, राजू शेट्टी यांच्या रूपाने एक जबरदस्त दबाव गट राज्यपातळीवर तयार झाला. याचा लाभ विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना झाला. शेतकर्‍यांना उसाचे अर्थकारण खर्‍या अर्थाने शेट्टी यांच्यामुळेच उमगले. शेतकर्‍यांनी खंबीरपणे साथ दिल्याने जिल्हा परिषद, विधानसभा आणि दोन वेळा लोकसभा निवडणूक जाता जाता जिंकली. मिळालेल्या संधीचा लाभ उठवत त्यांनी देशभरातील दोनशे शेतकरी संघटनांची मोट बांधली आणि देशपातळीवरील शेतकरी नेता अशी ओळख तयार करण्यास ते यशस्वी झाले. पण होम पीचवर दुर्लक्ष झाले.

चळवळीला ठाम भूमिकेची गरज

सातत्याने राजकीय भूमिका बदलल्या याचे दूरगामी परिणाम चळवळीवर झाले. रिडालोस ते महाविकास आघाडी या राजकीय प्रवासात चळवळीची हानीच झालेली आहे. ज्या कारणाने शरद जोशींपासून बाजूला गेले, त्या भाजपसोबत त्यांनी घरोबा केला. पण तिथेही फार काळ रमले नाहीत. आता महाविकास आघाडीकडूनही भ्रमनिरास झाल्याने तेथूनही बाहेर पडणार आहेत. 5 एप्रिलला नवी घोषणा होण्याची शक्यता आहे.

निष्ठावंत सहकारी का दुखावले?

शेतकरी चळवळ ऐन बहरात असताना सदाभाऊ खोत यांना सोडचिठ्ठी दिली. शिवाजीराव माने यांनी जय शिवराय किसान संघटना काढली. रविकांत तुपकरांची घरवापसी झाली असली तरी ते किती दिवस रमतात याचा अंदाज बांधता येत नाही. आमदार देवेंद्र भुयार नॉट रिचेबल आहेत. या सर्व सहकार्‍यांना प्रति राजू शेट्टी अशी ओळख होती. ते का गेले याचा अजूनही अर्थ सापडलेला नाही. आता नवा मित्र शोधताना आहे ते शिलेदार दुखावणार नाहीत हे ध्यानात घेतले पाहिजे.

Back to top button