तासगावमध्ये सापडली तीनशे वर्षांपूर्वीची विहीर

तासगावमध्ये सापडली तीनशे वर्षांपूर्वीची विहीर

तासगाव : पुढारी वृत्तसेवा

शहरातील ढवळवेस येथील ऐतिहासिक विहिरीची पालिकेकडून दोन दिवसांत स्वच्छता पूर्ण होईल. या विहिरीला बारव असे म्हणतात. ती तीनशे वर्षांपूर्वीची असावी, असे अभ्यासक महेश मदने यांनी सांगितले.

ही विहीर साठ ते शंभर फूट खोल असून तिचा वरील बाजूचा आकार कुलूप किंवा पिंडीसारखा आहे. खालील भागात मारुती मंदिर आणि सभामंडपदेखील आहे. पालिकेकडून 'माझी वसुंधरा' या अभियानांर्तगत सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेत या विहिरीचा शोध लागला.
पालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी या विहिरीची स्वच्छता करण्याचे काम हाती घेतले आहे. सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत व शिवनेरी ग्रुपने त्यासाठी पाठपुरावा केला होता.

बारव हा प्रकार तसा तासगाव तालुक्यात नवीन आहे. जिल्ह्यात 20 ते 25 बारव आहेत. विटा- नेवरी येथे 700 वर्षांपूर्वीची जुनी बारव आजही उत्तम आहे. विहिरीत एका बाजूला पायर्‍या असतात. बारवेला दोन्ही बाजूंनी पायर्‍या असतात. बारव या षटकोनी, अष्टकोनी, आयताकृती व वर्तुळाकार असतात. येथील बारव वर्तुळाकार आहे. त्याचे बांधकाम दगडी व आतील गाभारा विटांनी बांधलेला आहे. बारवेत उतरताना डाव्या बाजूला देवनागरी लिपीतील शिलालेख आहे.

विहिरीतील मारुती मंदिरामध्ये पूर्वी भजन होत असे. गाभार्‍यात 7 दिवळ्या आहेत. मंदिर असल्यामुळे लोक हे देवाचे पाणी आहे, या श्रद्धेने पाय धूत नसत. त्यामुळे स्वच्छ राहणारे पाणी पिण्यासाठी वापरले जात असे.

जिल्ह्यात 25 बारव : महेश मदने

मदने म्हणाले, बारव या बारमाही पाण्यासाठी ओढा नाहीतर नदीकाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने बांधल्या जात. पिण्याचे पाणी बारमाही मिळावे, हा उद्देश होता. पांडवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन अशा बारव आहेत. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी जिल्ह्यात 25 बारव बांधल्या आहेत.

तासगावचा ऐतिहासिक ठेवा जपूया : पाटील

मुख्याधिकारी पाटील म्हणाले, तासगाव शहराला ऐतिहासिक परंपरा आहे. ही बारव म्हणजेही ऐतिहासिक ठेवा आहे. पालिकेकडून तो जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बारव स्वच्छ करून जतन केली जाणार आहे. तिचे संवर्धन करताना मूळ रूपाला बाधा येणार नाही, याचीही काळजी घेतली जाणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news