बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
जनावरांनाही अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपचार करण्यास मदत व्हावी, यासाठी ७ जिल्ह्यांकरिता बेळगाव येथे सुपर मल्टीस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाचे लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे. येथील महांतेशनगर येथे केएमएफ डेअरीच्या शेजारी दवाखान्याची नवी इमारत उभारण्यात आली आहे.
मल्टी स्पेशालिटी जनावरांच्या दवाखान्यामध्ये अद्ययावत उपचाराची सोय करण्यात येणार आहे. एक्सरे मशिन, अल्ट्रासाऊंड अशा अद्ययावत मशिन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनावरांवर उपचार करण्यात येणार आहेत. याबरोबरच तंत्रज्ञानाला आवश्यक असणारे मनुष्यबळही सरकारकडून उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाची हाताळणी करण्यात येणारे तज्ज्ञ डॉक्टरही असणार आहेत.
सात जिल्ह्यांसाठी विभागीय रुग्णालय म्हणून ओळखले जाणार आहे. बेळगाव, बागलकोट, विजापूर, धारवाड, गदग, हावेरी आणि कारवार या जिल्ह्यासाठी महत्त्वाचे रुग्णालय ठरणार
आहे.
या रुग्णालयाच्या माध्यमातून 24 तास सेवा दिली जाणार आहे. गंभीर आजार असलेल्या जनावरांना ने-आण करण्याठी दोन अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मल्टी स्पेशालिटी जनावरांच्या रुग्णालयासाठी 3 कोटी रु. खर्च करण्यात आले आहेत. अद्ययावत मशिनी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. लवकरच या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. – डॉ. ए. के. चंद्रशेखर, जिल्हा पशु वैद्यकीय उपसंचालक