कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस एप्रिलमध्ये धावणार? | पुढारी

कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस एप्रिलमध्ये धावणार?

मिरज : पुढारी वृत्तसेवा

रेल्वे बोर्डाने झिरो बेस टाईमटेबल केल्याने रेल्वे गाड्यांच्या प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. त्यामुळे मे महिन्याच्या सुरुवातीस सर्व एक्स्प्रेस, इंटरसिटी आणि मेल रेल्वेगाड्या सुरू होणार आहेत. तसेच कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला धावण्याची शक्यता आहे.

यापूर्वी रेल्वे बोर्डाकडून लिंक गाड्या चालविण्यात येत होत्या. त्यामुळे गाडी निश्चित स्थळी पोहोचल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी स्थानकात किंवा स्थानकाबाहेर थांबविण्यात येत असे.आता रेल्वे बोर्डाकडून झिरो बेस टाईमटेबल आखण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासाच्या वेळेतदेखील बचत होणार आहे. तसेच निश्चित स्थळी गाडी पोहोचल्यानंतर ती तातडीने दुसर्‍या मार्गावर पाठविण्यात येणार आहे. तसेच या टाईम टेबलमुळे गाड्यांचे थांबे कमीकरून वेगमर्यादा देखील वाढविण्यात येणार आहे.

कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून अनेक इंटरसिटी, शताब्दी, मेल, एक्स्प्रेस इत्यादी रेल्वे गाड्या बंद आहेत. त्या सर्व गाड्या मेपासून सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.शासनाने सध्या राज्यातील सर्व निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे रेल्वे गाड्या सुरू करण्यास राज्यशासनाने परवानगी दिल्यास मे पासून सर्व गाड्या सुरू होतील, असे रेल्वे बोर्डाकडून सांगण्यात आले.

कोल्हापूर-कलबुर्गी ही गाडी देखील एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.सध्या बंद असलेल्या कोल्हापूर-सोलापूर या गाडीचा हैद्राबादपर्यंत विस्तार करण्याची देखील गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असून विस्तार करण्याच्यादृष्टीने रेल्वे बोर्डाचा विचार असल्याचे सांगण्यात आले.

Back to top button