Islampur : ‘रेल्वेत नोकरी’ देतो म्हणून ; 34 लाखांची फसवणूक | पुढारी

Islampur : ‘रेल्वेत नोकरी’ देतो म्हणून ; 34 लाखांची फसवणूक

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा
रेल्वेत नोकरी देतो म्हणून येथील चौघांची 33 लाख 98 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी 6 जणांच्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नंदकुमार युवराज सूर्यवंशी (वय 36, रा. इस्लामपूर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार एक वर्षापूर्वी घडला होता. फिर्यादी, फिर्यादीची बहीण, भाऊ व मित्र अशा चौघांंची फसवणूक झाली आहे. किरण मधुकर पाटील, गोविंद गंगाराम गुरव, विश्‍वजित माने, अजित पाटील, शैलेंद्रकुमार सिंग, विकासकुमार अशी या गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

भाजपचे मालेगावी ‘जोडे मारो’, आंदोलन ; नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : सूर्यवंशी यांच्या बहिणीस त्यांचे नातेवाईक महेश क्षीरसागर यांनी किरण पाटील हे शासकीय नोकरी मिळवून देतात, असे सांगितले होते. सूर्यवंशी व त्यांची बहीण राजश्री बावस्कर यांनी किरण पाटील यांची मार्च 2021 मध्ये भेट घेतली. त्यावेळी त्याने “तुम्हाला शासकीय नोकरी पाहिजे असेल तर 10 लाख रुपये द्यावे लागतील”, असे सांगितले. रेल्वे खात्यात किंवा आयकर विभागात तुम्हाला नोकरी देतो, असे पाटील याने त्यांना आश्‍वासन दिले. नोकरी मिळालेल्या काही व्यक्तींचीही नावे सांगितली.

त्यामुळे पाटील याच्यावर विश्‍वास ठेवून सूर्यवंशी यांनी त्यांना व त्यांच्या बहिणीला रेल्वेत नोकरी देण्या साठी पाटील याच्या सांगण्यावरून गोविंद गुरव याच्या बँक खात्यावर 2 लाख रुपये भरले. त्यानंतर दि. 7 मार्चला फिर्यादी व त्याच्या बहिणीला दिल्ली येथे बोलावून घेतले.तेथे विश्‍वजित माने व अजित पाटील यांची ओळख करून दिली. मेडिकल टेस्ट करण्यासाठी पुन्हा त्यांच्याकडून एक लाख रुपये घेण्यात आले. दि. 19 एप्रिल 2021 रोजी ट्रेनिंगसाठी मुजफ्फरनगर येथे जाण्याच्या बहाण्याने सतीशकुमार व शैलेंद्रकुमारसिंग या दोघांची ओळख करून देण्यात आली. मात्र त्या ठिकाणी ट्रेनिंग झाले नाही.

या दरम्यान या संशयितांनी फिर्यादी, त्यांचा भाऊ अमृत सूर्यवंशी आणि फिर्यादीचा मित्र सूरज डोंगरे यांच्याकडून एकून 33 लाख 98 हजार रुपये उकळले होते. पैसे देऊनही नोकरी मिळत नसल्याने सूर्यवंशी यांनी पोलिसात तक्रार देण्याची धमकी दिल्यानंतर किरण पाटील याने खोटी कागदपत्रे तयार केली. फिर्यादी व त्याच्या बहिणीला ते परीक्षेस बसले नसतानाही ते रेल्वेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे व त्यांना बुकिंग क्‍लार्क म्हणून नोकरी लागल्याचे सांगितले. ही कागदपत्रे घेऊन सूर्यवंशी मिरज येथील रेल्वेच्या कार्यालयात चौकशीसाठी गेले. त्यावेळी त्यांना ती कागदपत्रे खोटी आहेत. रेल्वेत बुकिंग क्‍लार्क हे पदच अस्तित्वात नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे सूर्यवंशी यांनी इस्लामपूर पोलिसात या 6 जणांच्याविरोधात फिर्याद
दिली.

हेही वाचलत का ?

Back to top button