Sangali : सांगलीत 500 बेडचे हॉस्पिटल होणार ; पृथ्वीराज पाटील यांचा पाठपुरावा | पुढारी

Sangali : सांगलीत 500 बेडचे हॉस्पिटल होणार ; पृथ्वीराज पाटील यांचा पाठपुरावा

सांगली : पुढारी वृत्तसेवा
पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील सर्वोपचार रुग्णालयातील (सांगली सिव्हिल) नवीन 500 बेडच्या हॉस्पिटलसाठी 233 कोटींच्या प्रस्तावास गुरुवारी मान्यता देण्यात आली. मंत्रालयात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला, अशी माहिती काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली.

ते म्हणाले, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी बैठक घेऊन या प्रस्तावाच्या मंजुरीचे आदेश दिले होते. या हॉस्पिटलसाठी पालकमंत्री जयंत पाटील यांनी वेळोवेळी मार्गदर्शन आणि मोलाचे सहकार्य केले. तसेच कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनीही सहकार्य केले. या दोघांच्या सहकार्यामुळेच हा हॉस्पिटल प्रस्ताव मंजूर होणे शक्य झाले. ते म्हणाले, या मंजूर प्रस्तावामध्ये 500 बेडचे चार मजली हॉस्पिटल असेल. दोनशे निवासी डॉक्टरांसाठी तीन मजली वसतिगृह आणि अद्ययावत शवागार इमारतीचा समावेश आहे. सुमारे 52 हजार, 673 चौरस मीटर बांधकाम होणार आहे.

पाटील म्हणाले, वसंतदादा रुग्णालयात सध्या 280 बेडसची व्यवस्था आहे. ती फारच अपुरी आहे. त्यावरील ताण सातत्याने वाढत चालला होता. तसेच मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या दीडशे विद्यार्थी क्षमतेनुसारही या बेडची संख्या अपुरी पडत होती. त्याकरिता आणखी पाचशे बेडचे नवीन हॉस्पिटल उभारण्यासाठी मी दि. 21 ऑक्टोबर 2020 रोजी ना. देशमुख यांना भेटून पत्र दिले होते. त्यानुसार तो प्रस्ताव त्यांनी मंजूर करून तो मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीकडे पाठवला होता.
पश्चिम महाराष्ट्रात सांगली हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूर हे जिल्हे तसेच सीमा भागातील लोकांना या रुग्णालयाचा चांगला लाभ होणार आहे. सर्व प्रकारच्या सुविधा या नव्या हॉस्पिटलमुळे उपलब्ध होणार आहेत. हे रुग्णालय होणे फार निकडीचे होते, असेही पाटील यांनी सांगितले.

हेही वाचलत का ?

Back to top button