नाशिक शहरात शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची 50 टक्केच हजेरी, कोरोनाचा प्रभाव कायम | पुढारी

नाशिक शहरात शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची 50 टक्केच हजेरी, कोरोनाचा प्रभाव कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना महामारीची तिसरी लाट अधिक तीव्र स्वरुपाची नसल्याने बहुतांश निर्बंध खुले करण्यात आले असून, शाळा-महाविद्यालयांचाही मार्ग मोकळा करण्यात आला आहे. असे असताना अजूनही शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती मात्र 50 टक्केच आहे. एकूणच कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा कल कमी झाला असून, विद्यार्थ्यांचा अजूनही भर ऑनलाइनवरच असल्याचे दिसून आले आहे.

मागील वर्षी मार्च ते मे या तीन महिन्यांमध्ये कोरोना महामारीची दुसरी लाट अत्यंत प्रभावी ठरली. पहिल्या लाटेतही अनेक कुटुंबांचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान झाले. या दोन्ही लाटांमुळे जवळपास दीड वर्ष शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. शाळांबरोबरच खासगी शिकवणी वर्गदेखील बंद ठेवून ऑनलाइन शिक्षणावरच भर देण्यात आला. दुसर्‍या लाटेची तीव—ता कमी होत नाही तोच ओमायक्रॉनमुळे पुन्हा धडधड वाढली; परंतु, या नव्या विषाणूचा प्रादुर्भाव आणि तिसरी लाटही प्रभावी न ठरल्याने केंद्र तसेच राज्य शासनाने हळूहळू सर्वच निर्बंध खुले केल्याने शाळा-महाविद्यालये आणि शिकवणी वर्ग भरविण्यास परवानगी देण्यात आली. यामुळे बहुतांश शहरातील प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालये सुरू असली तरी त्यातील विद्यार्थ्यांची संख्या मात्र निम्मीच आहे.

शहरात 168 इतक्या अंगणवाड्या आहेत. यापैकी सध्या 77 अंगणवाड्या सुरू आहेत. प्राथमिक विभागांतर्गत मनपाच्या 98 पैकी 98 शाळा सुरू असून, खासगी शिक्षणसंस्थांच्या 351 पैकी 336 शाळा सुरू आहेत. तर माध्यमिक विभागांतर्गत मनपाच्या 18 पैकी 14 आणि खासगी संस्थेच्या 203 पैकी 200 शाळा सुरू आहेत.
सरासरी 97 टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण जवळपास दोन महिन्यांपासून शाळा खुल्या झाल्या असून, वर्ग पुन्हा गजबजू लागले आहेत. शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने शिक्षकांचे लसीकरण पूर्ण होणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार मनपाच्या 950 (98 टक्के) आणि खासगी शाळांच्या 6116 (97 टक्के) शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर लसीकरण झालेले, परंतु कोरोना बाधित आढळून आलेल्या शिक्षकांची संख्या 149 इतकी असून, त्यात मनपाचे 34 तर खासगी शाळांमधील 115 शिक्षकांचा समावेश आहे. सध्या प्राथमिक विभागाच्या सहा तर माध्यमिक विभागाच्या पाच शाळा बंद आहेत.

अशी आहे विद्यार्थ्यांची उपस्थिती
अंगणवाड्यांमधील एकूण 10,403 पैकी 1662 (15.98 टक्के) विद्यार्थी उपस्थित राहत असून, मनपाच्या प्राथमिक शाळेतील 26,921 पैकी 15,791 (58.39 टक्के) आणि खासगी शिक्षण संस्थांमधील 1 लाख 27 हजार 607 पैकी निम्मे म्हणजेच 63 हजार 689 (49.91 टक्के) इतकेच विद्यार्थी हजेरी लावत आहेत. तर दुसरीकडे मनपाच्या माध्यमिक शाळेत 2,292 पैकी 1,353 (59.03 टक्के) आणि खासगी शिक्षण संस्थांमधील 65,714 पैकी 36,211 (55.10टक्के) विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याची मनपाच्या शिक्षण विभागाकडे आहे.

हेही वाचा :

Back to top button