भाजपचे मालेगावी ‘जोडे मारो’, आंदोलन ; नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी | पुढारी

भाजपचे मालेगावी ‘जोडे मारो’, आंदोलन ; नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव येथील भारतीय जनता पक्षाने गुरुवारी (दि.24) जोडे मारो आंदोलन केले. मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याच्या नातलगांशी आर्थिक हितसंबंध प्रस्थापित करणे हा एकप्रकारे देशद्रोहच असून, अशा व्यक्तीने सरकारमध्ये राहण्याचा काही अधिकार नाही, त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना बुधवारी ‘ईडी’ने अटक केली. या अटकेच्या निषेधार्थ एकीकडे महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात येत असताना दुसरीकडे भाजपने मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. भाजपचे मालेगाव जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या नेतृत्वात जिल्हा कार्यालयाजवळ मलिक यांच्या छायाचित्राला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्या नातलगाशी आर्थिक व्यवहार केल्याचा मंत्री मलिक यांच्यावर आरोप आहे. हे प्रकरण गंभीर असून, मलिक यांनी त्वरित राजीनामा द्यायला हवा होता, असे जिल्हाध्यक्ष निकम, उपजिल्हाध्यक्ष हरिप्रसाद गुप्ता, ज्येष्ठ नेते भरत पोफळे यांनी मत मांडले. याप्रसंगी नवाब मलिक यांच्या विरोधात जोरदार घोषणा करण्यात आली.

यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस देवा पाटील, सुधीर जाधव, मुकेश झुणझुणवाला, नगरसेवक संजय काळे, हेमंत पुरकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुनील शेलार, कुणाल सूर्यवंशी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्याम गांगुर्डे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील भदाणे, रवींद्र सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button