सांगली: म्हैसाळ येथील सावकार धुमाळ टोळी तडीपार | पुढारी

सांगली: म्हैसाळ येथील सावकार धुमाळ टोळी तडीपार

सांगली ः पुढारी वृत्तसेवा: म्हैसाळ (ता. मिरज) येथील शैलेश रामचंद्र धुमाळ या सावकारासह सहा जणांच्या टोळीला जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी हे आदेश दिले आहेत. शैलेश रामचंद्र धुमाळ (वय 55), आशिष शैलेश धुमाळ (30), जावेद बंडू कागवाडे (35), अमोल आनंदा सुतार (35), सुरेश हरी शिंदे (56), बाबासाहेब बापू हेरवाडे (63, रा. सर्व म्हैसाळ) अशी त्यांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले, या टोळीविरुद्ध सन 2019 व 2021 मध्ये बेकायदेशीर सावकारी करून लोकांना पैसे देऊन दिलेल्या कर्जावर भरमसाट व्याज घेणे, त्याशिवाय जागा, जमीन, इमारत अशा मालमत्ता बळकावणे, कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणे, लोकांना आत्महत्येस प्रवृत्त करणे, मारामारी करणे असे गंभीर स्वरूपाचे 6 दखलपात्र व 2 अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 55 अन्वये पोलिस अधीक्षकांकडे तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता.

प्रस्तावाबाबत अधीक्षक गेडाम यांनी पाहणी करून टोळीच्या हालचाली, टोळीतील सदस्यांनी दिलेले म्हणणे याबाबत त्यांची सुनावणी घेतली. जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले. या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत निशाणदार, मिरज ग्रामीणचे पोलिस निरिक्षक चंद्रकांत बेदरे यांनी भाग घेतला.

म्हैसाळ येथील दारू दुकान सील

धुमाळ याने म्हैसाळ येथील दारू दुकानाची जागा सावकारी व्याजाच्या बदल्यात जागा नावावर करून घेतली होती. त्यानंतर ते दुकान त्याने तसेच सुरू ठेवले होेते. याबाबत माहिती पुढे आल्यानंतर त्याच्यावर कारवाई होऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर हे दारू दुकान सील करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button