नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोविड 19 मुळे जीव गमावलेल्या नऊ हजार रुग्णांच्या नातेवाइकांनी 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळण्यासाठी अर्ज केले असून, त्यापैकी एक हजार अर्ज महापालिकेमार्फत फेटाळण्यात आले आहेत. फॉर्म भरण्यातील त्रुटी आणि एकाच कुटुंबातील जास्त सदस्यांनी भरपाईसाठी अर्ज केल्याने संबंधित अर्ज ड्युप्लिकेशनमुळे वैद्यकीय विभागाने नाकारले आहेत.
कोरोना महामारीमुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबातील वारसांना दिलासा मिळावा यादृष्टीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक राज्याच्या मदत व पुनर्वसन खात्याअंतर्गत मृत रुग्णांच्या कुटुंबाला 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य अदा केले जात आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून ही प्रक्रिया राबवून पात्र कुटुंबीयांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज छाननीसाठी जिल्हा रुग्णालय तसेच महापालिका, नगरपालिका स्तरावर वैद्यकीय विभागाकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नाशिक महापालिकेकडे आतापर्यंत एकूण नऊ हजार इतके अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी सुमारे एक हजार अर्ज नाकारण्यात आले आहेत. एकाच रुग्णाच्या कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांनी भरपाईसाठी अर्ज करण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे अशा स्वरूपाचे अर्ज नाकारण्यात आल्याची माहिती मनपा वैद्यकीय विभागाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. एका केसमध्ये तर मृत व्यक्तीच्या कुटुंबातील वडील आणि दोन मुलांनी अर्थसहाय्यासाठी एकाच दिवशी अर्ज केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे ड्युप्लिकेशनचे अर्ज शोधण्यासाठी मोहीमच हाती घेण्यात आली आहे.
फॉर्म भरण्यातील त्रुटी हे अर्ज नाकारण्याचे दुसरे सर्वांत मोठे कारण आहे. मृत व्यक्तीच्या नावाऐवजी स्वत:चेच नाव टाकणे, आधारकार्ड समाविष्ट न करणे, अर्जदाराच्या बँकेची माहिती न देता मृत व्यक्तीच्या खात्याची माहिती देणे अशा विविध कारणांमुळे अर्ज नाकारण्यात आले आहेत.
नाकारलेल्या अर्जदारांना जिल्हाधिकारी, जिल्हा रुग्णालय तसेच मनपाच्या वैद्यकीय विभागाच्या तक्रार निवारण समित्यांकडे योग्य कागदपत्रांसह अपील करता येऊ शकते.
– डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक