सांगली : बार व्यवस्थापकाला मारहाण करून तोडफोड | पुढारी

सांगली : बार व्यवस्थापकाला मारहाण करून तोडफोड

कुपवाड : पुढारी वृत्तसेवा :  कुपवाड – मिरज एमआयडीसी रस्त्यालगत असलेल्या हॉटेल अशोक बारचे व्यवस्थापक नागनाथ निवृत्ती शिंदे (वय 32, सध्या रा. ज्ञानगिरी वसाहत, सावळी, मूळ गाव बनेवाडी, ता. कवठेमहांकाळ) यांना मारहाण करून बारमधील साहित्यांची तोडफोड करण्यात आली. याबाबत जखमी शिंदे यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी सहाजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : कुपवाड – मिरज रस्त्यालगत असलेल्या हॉटेल अशोका बारमध्ये सोमवारी सायंकाळी सहा अज्ञात तरुण गेले. यातील एका तरुणाने कमरेला लावलेला धारदार कोयता काढून हॉटेलच्या लाकडी कपाटात ठेवलेल्या बीअर, विदेशी दारूच्या बाटल्या व इतर साहित्याची तोडफोड करण्यास सुरुवात केली. व्यवस्थापक नागनाथ शिंदे यांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, त्यातील एका संशयिताने शिंदे याच्या डोक्यात दारुची बाटली फोडली. यात शिंदे हे जखमी झाले. यावेळी बार मालकाचा मुलगा प्रतीक हे मध्यस्थी करीत असताना त्यांनाही या सहा संशयितांनी शिवीगाळ केली.त्यानंतर हॉटेलातील इतर साहित्याची तोडफोड केली. या तोडफोडीत अंदाजे 50 हजार रुपये किंमतीचे नुकसान झाले आहे. त्यानंतर संशयित फरार झाले.

सांगली : सहा नगरपालिका निवडणुकांचा बिगुल

हॉटेलमध्ये चोरीचा प्रकार

कोरोना कालावधीत अशोका हॉटेल हे काही दिवस बंद होते. या कालावधीत या सहा जणांपैकी काही संशयितांनी हॉटेल फोडून बारमधील विदेशी दारू, बिअरच्या बाटल्यांची चोरी केली होती, अशी माहिती हॉटेलचे मालक जगताप यांनी दिली.

Back to top button