मुलीचा मोबाइल चोरीला ; बस पोलिस ठाण्याला | पुढारी

मुलीचा मोबाइल चोरीला ; बस पोलिस ठाण्याला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मोबाइल बसमध्ये चढताना चोरीस गेल्यानंतर मोबाइल शोधासाठी बस तब्बल दीड तास थांबवण्यात आली. सरकारवाडा पोलिसांनी बसमधील प्रत्येकाची तपासणी केल्यानंतर मोबाइल सापडला नाही. त्यामुळे बस त्र्यंबकेश्वरला पाठवण्यात आली. या घटनेमुळे प्रवाशांना लेटलतीफ पोलिसांचा व चोरट्यांचा अनुभव आला.

जुने सीबीएस येथून सोमवारी (दि.21) दुपारी 3.30 च्या सुमारास एमएच 14, बीटी 0367 क्रमांकाची बस त्र्यंबकेश्वर येथे जाणार होती. बस येताच त्र्यंबकेश्वरला जाणार्‍या प्रवाशांची गर्दी झाली. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थीही होते. बसमध्ये चढताना दरवाजात गर्दी होत असते. या गर्दीचा फायदा घेत चोरटे चोरी करतात. त्याप्रमाणे चोरट्याने एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मोबाइल चोरून नेला. हा प्रकार उघडकीस येताच विद्यार्थिनीने तक्रार केली. बसचालक व वाहकाने प्रवाशांकडे विचारणा केली, पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली. मात्र, बसमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार बसस्थानकावरील बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलिस तेथे हजर नसल्याने ते अर्धा तास उशिराने आले. तोपर्यंत बस तेथेच थांबवण्यात आली होती.

मोबाइल चोरीला गेल्याने विद्यार्थिनीचे डोळे ओले झाले होते. अखेर पोलिस आल्यानंतर प्रवाशांसह बस सरकारवाडा पोलिस ठाण्यात आणली. तेथे प्रत्येक प्रवाशाची तपासणी करण्यात आली, मात्र मोबाइल आढळून आला नाही. त्यामुळे विद्यार्थिनीस रिकाम्या हातीच घरी जावे लागले. तर पोलिसांनीही खबरदारी म्हणून बसमध्ये चढताना किंवा गर्दीत असल्यावर पाठीवरील बॅग छातीला लावण्याचा सल्ला दिला. अखेर सायंकाळी 5 नंतर बस त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना झाली.

हेही वाचा :

Back to top button