सांगली : बनावट दस्त नोंदणी प्रकरणात मोठे रॅकेट? | पुढारी

सांगली : बनावट दस्त नोंदणी प्रकरणात मोठे रॅकेट?

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा

बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस दस्त करून एकच प्लॉट अनेकांना विकल्याचा प्रकार येथे नुकताच उघडकीस आला आहे. या रॅकेटमध्ये अनेक बड्या हस्ती सक्रिय असल्याची चर्चा इस्लामपूर शहर परिसरात आहे. त्यामुळे पोलिसी मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचून या बनावट दस्त करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

गेल्या काही वर्षांपासून शहर व परिसरात जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात अनेकांनी मोठी गुंतवणूक केली आहे. प्लॉट खरेदी-विक्री व्यवहारात राजकीय पदाधिकार्‍यांच्यासह व्यापारी, उद्योजक, शासकीय नोकरदार, सावकार, गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे लोक असे समाजातील सर्वच स्तरांतील लोक सक्रिय आहेत. त्यामुळे असे व्यवहार घडवून आण्यासाठी एजंटांचीही मोठी साखळी येथे कार्यरत आहे. त्यातूनच बनावट खरेदी दस्त करून एकच प्लॉट अनेकांना विक्री करणे, दुसर्‍याच्या जमिनीची परस्पर विक्री करणे, असे अनेक प्रकार येथे उघडकीस येत आहेत.

बनावट कागदपत्रे तयार करून पेठ हद्दीतील दहा ते बाराजणांच्या प्लॉटचीही परस्पर विक्री केल्याचा धक्‍कादायक प्रकारही नुकताच उघडकीस आला आहे. हा दस्त करताना ऑनलाईन सात-बाराच बनावट तयार करून त्यात जमीन विकणार्‍यांची नावे लावण्यात आली आहेत. महसूल विभागातील काहींना हाताशी धरून ही बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याची चर्चा आहे. यामध्ये बड्या हस्ती सक्रिय असून तेच या सर्व व्यव्हाराचे खरे सूत्रधार असल्याचीही चर्चा आहे.पोलिसांना या रॅकेटच्या मुळापर्यंत जाण्याचे आव्हान आहे. सध्या तरी रेकॉर्डवर अशा कोणाचीच नावे आलेली नाहीत. मात्र पोलिस तपासात हे सर्व रॅकेट उघडकीस येईल, अशी अपेक्षा
आहे.

शासनाची शर्त तरीही खरेदी व्यवहार…
पेठ येथील एकाच गटातील यापूर्वी विक्री झालेले 10 ते 12 जणांचे प्लॉट पुन्हा दुसर्‍याच व्यक्तींच्या नावे विक्री करण्यात आल्याचा हा धक्‍कादायक प्रकार आहे. विशेष म्हणजे या गटावर ‘तबदिलीस मनाई’, असा शेरा आहे. तरीही हे व्यवहार कसे झाले, हाही संशोधनाचा विषय आहे.

हेही वाचा

Back to top button