धुळे : शेतीच्या वादातून सख्या चुलत भावानेच केला खून, निमझरी रोडवरील खुनाचा उलगडा | पुढारी

धुळे : शेतीच्या वादातून सख्या चुलत भावानेच केला खून, निमझरी रोडवरील खुनाचा उलगडा

धुळे पुढारी वृत्तसेवा : शिरपूर तालुक्यातील निमझरी शिवारातील तरुणाच्या डोक्यात दगड टाकून त्याचा खून (murder)  करणार्‍या मारेक-यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. शेतीच्या वादातून सख्ख्या चुलत भावानेच हा खून केल्याचे उघड झाले आहे.

निमझरी ते सावरपाडा रोड लगत असलेल्या एका नाल्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या तरुणाच्या डोक्यात दगड टाकून त्याचा निर्घुण खून केल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले. सावरपाडा येथील संजय पावरा असे या मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात प्रथमदर्शी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (murder)

या गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड आणि उपनिरीक्षक संदीप मुरकुटे यांचे स्वतंत्र दोन पथक तयार केले होते. पथकाने मयत संजय पावरा यांच्या संदर्भातील माहिती गोळा करणे सुरू केले असता, यात पथकाला त्याचा सख्खा चुलत भाऊ दरबार पावरा याच्यावर संशय आला. त्यांनी दरबार पावरा याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता दरबार यानेच हा खून केल्याचे निदर्शनास आले. संजय पावरा व त्यांचे वडील यांनी दरबार पावरा यांच्याकडे शेती गहाण टाकली होती. या जमिनीच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद होता. या वादाच्या रागातून दरबार पावरा यांनी संजय पावरा याला रस्त्यात गाठून त्याची हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. दरबार पावरा यास शिरपूर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 22 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा :

 

Back to top button